पुणे : जगभरात गेल्या १२ वर्षांत सहा महिन्यांखालील बालकांचे स्तनपानाचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढून ४८ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे हजारो बालकांचा जीव वाचत आहे. हे प्रमाण २०२५ पर्यंत ५० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट जागतिक आरोग्य संघटनेने ठेवले आहे. स्तनपानाचे प्रमाण वाढल्यास जगभरात दर वर्षी ८ लाख २० हजार बालकांचा जीव वाचू शकेल, असा अंदाजही संघटनेने व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने या सप्ताहानिमित्त स्तनपानास पाठबळ देण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. संघटनेने म्हटले आहे, की जगातील ४.५ अब्ज म्हणजेच निम्म्या लोकसंख्येला पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाहीत. अनेक महिलांना प्रसूतीनंतर मुलांना स्तनपान करता येईल, अशा सुविधा आणि पाठबळ मिळत नाही. त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला आणि समुपदेशनाची गरज असते. स्तनपानामुळे बालकांमधील आजारांचा धोका कमी होतो. याचबरोबर मातेपासून त्यांना काही प्रकारचे कर्करोग आणि असंसर्गजन्य आजार जडण्याचा धोकाही कमी होतो.

आणखी वाचा-राज्यभरातील बाजारपेठा २७ ऑगस्टला बंद? व्यापारी आंदोलनाच्या पावित्र्यात का?

स्तनपानाला प्रोत्साहन दिल्यास स्तनपान देणाऱ्या महिलांची संख्या दुपटीने वाढू शकते. त्यामुळे हे पाठबळ देण्याची जबाबदारी कुटुंब, समाज, आरोग्य कर्मचारी, धोरणकर्ते या सर्वांची आहे. जगातील निम्मे देश स्तनपानाची आकडेवारी संकलित करीत नाहीत. स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी देशांनी आपल्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर कामाच्या ठिकाणी महिलांसाठी स्तनपानासाठी स्वतंत्र कक्ष, अल्पकालीन सुटी, पालकत्व रजा या गोष्टी उपलब्ध करून द्यायला हव्यात. मातेच्या दुधाला पर्याय असलेल्या खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर निर्बंध आणायला हवेत, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा-पावसामुळे फळभाज्यांकडे ग्राहकांनी फिरवली पाठ… पालेभाज्यांच्या दरात वाढ

जन्मापासून सहा महिने होईपर्यंत पूर्णपणे स्तनपान आणि नंतर किमान दोन वर्षांपर्यंत स्तनपानाबरोबर पूरक आहार बालकांना सुरू ठेवावा. स्तनदा मातेनेही या काळात संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. स्तनपानाबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे स्तनपान सल्लागाराकडून मातेचे समुपदेशन महत्त्वाचे ठरते. -डॉ. रिबेका गोसावी, स्तनपान सल्लागार, मणिपाल हॉस्पिटल (खराडी)

मातेचे दूध हे बाळासाठी आवश्यक पोषणमूल्यांचा स्रोत असतो. बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले मेद, कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिज हे घटक त्यात योग्य प्रमाणात असतात. त्यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासोबत त्याची प्रतिकारशक्ती वाढते. त्याचे आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते. -डॉ. सचिन शहा, बालरोगतज्ज्ञ, सूर्या मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटल

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On world breastfeeding week learn about the benefits of breastfeeding for mothers and babies pune print news stj 05 mrj