पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये शुक्रवार आणि शनिवारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. उत्तर कोकणापासून उत्तर दिशेला हवेची द्रोणीय रेषा तयार झाली आहे. जम्मू ते उत्तर पाकिस्तानपर्यंत पश्चिमी विक्षेप (थंड हवेची स्थिती) तयार आहे, त्यामुळे दक्षिण हरयानासह लगत परिसरात हवेच्या वरील स्तरात हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि आग्नेय दिशेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा मध्य भारतात संयोग होऊन मध्य भारत, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नंदूरबारमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे येत असल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात पुढील चार-पाच दिवस ढगाळ वातावरण राहून किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बुधवारी राज्यात जळगाव येथे १२.३ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे, तर रत्नागिरी येथे ३३.५ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली.

हेही वाचा… राज्याचे साखर उत्पादन ९५ लाख टनांवर जाणार

हेही वाचा… रेल्वेचे असेही ‘कोट्यधीश’ तपासनीस! फुकट्या प्रवाशांना भरवताहेत धडकी

खासगी हवामान संस्था स्कायमॅटने सुद्धा विदर्भ आणि मराठवाड्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या संस्थेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यासह शेजारच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथेसुद्धा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ या भागातसुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान जानेवारी महिन्यात विदर्भातील सात तर महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात थंडीच्या तीव्र लाटेचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once again unseasonal rain in some parts of maharashtra in next two days pune print news dbj 20 asj
Show comments