लोणावळ्यातील पादत्राणे विक्री दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा दीड लाख रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत सखाबाई गबळू कालेकर (रा. प्रेमनगर, कुसगाव, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणावळ्यातील बाजारपेठेतील पादत्राणे विक्री करणाऱ्या दुकानात कालेकर आल्या होत्या.
त्या वेळी पादत्राणे खरेदीसाठी दोन महिला आल्या होत्या. आरोपी महिलांनी कालेकर यांच्या पिशवीतून ९० हजारांचे सोन्याचे दागिने आणि ६० हजारांची रोकड असा ऐवज लांबविला. कालेकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. चित्रीकरणात आरोपी महिलांनी कालेकर यांच्या पिशवीतून ऐवज लांबविल्याचे आढळून आले आहे. पोलीस हवालदार महादेव म्हेत्रे तपास करत आहेत.