महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यावन्ये (मोक्का) कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या गुंडाला पोलिसांनी पकडले. राहील अब्दुलरहीम सय्यद (वय ३२, रा. दिल्लीवाला वाडा, गणेश पेठ) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. राहिल आणि साथीदारांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. त्याच्या साथीदारांना फरासखाना पोलिसांनी अटक केली होती. राहील पसार होता.
गेले वर्षभर राहील पोलिसांना गुंगारा देत होता. तो त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी तुषार खडके यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला पकडण्यात आले.
सहायक आयुक्त सतीश गोवेकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे शाखेचे निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन मोकाशी, तुषार खडके, रिजवान जिनेडी, अजित शिंदे, सचिन सरपाले, वैभव स्वामी आदींनी ही कारवाई केली.