पिस्तूल व काडतुसे विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या रांजणगाव औद्योगिक विभागातील एका लघुउद्योजकास ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन पिस्तूल व १७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
अतुल सुरेश पिंगळे (वय २७) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंगळे याचा रांजणगाव औद्योगिक विभागामध्ये शिव अॅग्रो इंडस्ट्रीज या नावाने लघुउद्योग आहे. रांजणगाव औद्योगिक विभागामध्ये एक व्यक्ती गावठी पिस्तूल व काडतुसांची विक्री करणार असल्याची माहिती बुधवारी ग्रामीण पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. या माहितीवरून पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, अपर पोलीस अधीक्षक विजय मगर, रवींद्रसिंह परदेशी, पोलीस निरीक्षक शिवाजी देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने एमआयडीसी परिसरामध्ये सापळा लावला.
पिंगळे हा पोलिसांच्या सापळ्यामध्ये सापडला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता व त्याची झडती घेतल्यानंतर पोलिसांना पिस्तूल व जिवंत काडतुसे मिळाली. पिस्तूल व काडतुसे त्याने विक्रीसाठी आणल्याचे समजले. या गोष्टी त्याने कुठून आणल्या व त्याची तो कुणाला विक्री करणार होता, याबाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
तीन पिस्तूल व काडतुसे विक्रीसाठी आणणाऱ्या लघुउद्योजकास अटक
पिस्तूल व काडतुसे विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या रांजणगाव औद्योगिक विभागातील अतुल सुरेश पिंगळे (वय २७) या लघुउद्योजकास ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
First published on: 11-10-2013 at 02:36 IST
TOPICSपिस्तूल
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One arrested for trying to sell pistol