लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: शिवाजीनगर येथील करोना काळजी केंद्र गैरव्यवहार प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी मुंबईतून एकास अटक केली. राजू नंदकुमार साळुंखे (वय ५०, रा. परळ, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. साळुंखे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली. करोना काळजी गैरव्यवहार प्रकरणी लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे संचालक सुजित मुकुंद पाटकर, डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे यांच्या विरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) कार्यकारी अभियंता राजू ठाणगे (वय ४७) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
आणखी वाचा- पुण्यात पर्यावरणप्रेमींचे ‘चिपको’ आंदोलन, नदीकाठावरील वृक्षतोडीविरोधात असंतोष
लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला अनुभव नसताना पुणे महापालिकेच्या करोना काळजी केंद्र चालविण्याचे कंत्राट देऊन मोठा गैरव्यवहार करण्यात आला. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीचे संचालक सुजित पाटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. पाटकर शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहे. दि.१० एप्रिल रोजी त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करुन संबंधितांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली होती.