कुख्यात गुंड गजा मारणे टोळीचा सराईत गुन्हेगार कुणाल पोळ याचा गोळ्या घालून खून केल्याच्या आरोपावरून स्वारगेट पोलिसांनी एकास अटक केली आहे. त्याच्या फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. न्यायालयाने अटक केलेल्या आरोपीला १९ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
डी. उर्फ दत्ता अर्जुन चव्हाण (वय २४, रा. पीएमसी कॉलनी, घोरपडी पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर, मुख्य सूत्रधार जंगळ्या उर्फ विशाल शाम सातपुते, मंगेश सातपुते, गणेश शंकर पवार, रोहन लक्ष्मण चव्हाण, तुषार सातपुते, बबन उर्फ रिजवान सय्यद (सर्व- घोरपडे पेठ), शंकर कोळी, सचिन देवगिरे (कोंढवा) यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री या आरोपींनी नेहरू रस्त्यावरील सम्राट हॉटेलमध्ये गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून कुणाल पोळचा खून केला होता. या घटनेत हॉटेलचा मालक शिरीष जयराम शेट्टी (वय ३४) याच्या मांडीतून आरपार गोळी गेली आहे. तर, सनी वसंत गवते (वय २९, रा. नाना पेठ) हा गंभीर जखमी आहे. स्वारगेट पोलिसांनी घटनेनंतर चार पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास चव्हाण यांना ताब्यात घेतले. हा खून जमिनीच्या वादातून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम पठारे अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader