लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. सध्या मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण (सिन्क्रोनायझेशन) करण्यात येत आहे. त्यानुसार यंदा लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभा मतदार संघांसाठी १५०० मतदारांसाठी एक केंद्र निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदान केंद्रांत वाढ होणार आहे.

शहरासह जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी १७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत पुणेकरांना मतदारयादीत नाव नोंदविण्याची संधी आहे. ही नावे पुरवणी यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक शाखेकडून मतदार यादी अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या अंतर्गत दुबार, मयत मतदारांची नाव वगळणी, नवमतदार आणि समाजातील दुर्लक्षित घटकांची मतदान नोंदणी करण्यात येत आहे. तसेच मतदारांची मतदारयादीतील छायाचित्रे अद्ययावत करण्यात येत आहेत.

आणखी वाचा-नव्या कार्यकारिणीवरून पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये नाराजी

दरम्यान, पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी मावळ लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील मावळ, चिंचवड आणि पिंपरी या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे, तर उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघ रायगड जिल्ह्यातील आहेत. सन २०१९ मध्ये पुणे शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि उर्वरित ग्रामीण भागातील दहा असे मिळून एकूण २१ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची संख्या ७७ लाख २९ हजार २१७ एवढी होती. चालू वर्षी ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदारयादीनुसार शहरासह जिल्ह्यातील मतदारसंख्या ७९ लाख ५१ हजार ४२० झाली आहे. मतदार नोंदणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत येणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. चारही लोकसभा मतदारसंघात मिळून सन २०१९ मध्ये ७९०३ मतदान केंद्रे होती. या पार्श्वभूमीवर यंदा एका मतदान केंद्रावर १५०० मतदार यानुसार सन २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांमध्ये वाढ होणार असल्याचे निरीक्षण जिल्हा प्रशासनाकडून नोंदविण्यात आले.

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत नवमतदार नोंदणी, समाजातील दुर्लक्षित घटक यांच्यासाठी खास मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच सध्या मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येत आहे. लोकसभा निवडणूक मतदानासाठी शहरासह जिल्ह्यात १५०० मतदारांसाठी एक मतदान केंद्र असणार आहे. त्यापेक्षा जास्त असलेल्या मतदारांना नजिकच्या मतदान केंद्रात वर्ग केले जाईल किंवा नवे मतदान केंद्र सुरू करण्यात येणार आहे. -मिनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सवात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

लोकसभा मतदारसंघ- एकूण मतदान केंद्रे (२०१९)
पुणे- १,९९७

बारामती- २,३७२

मावळ- १,२३८

शिरूर- २,२९६

एकूण- ७,९०३

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One center for 1500 voters in the upcoming pune lok sabha elections pune print news psg 17 mrj