लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : पोलिसी कारवाईची भिती दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. परदेशातून पाठविलेल्या कुरिअरच्या पाकिटात अमली पदार्थ, परदेशी चलन सापडल्याची बतावणी करुन नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. बाणेर भागातील एका डॉक्टरची सायबर चोरट्यांनी एक कोटी एक लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका डॉक्टरांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार डॉक्टरांच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला. तुमच्या नावाने परदेशातून कुरिअर कंपनीने पाकीट पाठविले आहे. मुंबई विमानतळावर पाकीट जप्त करण्यात आले आहे. पाकिटात पाच पारपत्र, अमली पदार्थ, परदेशी चलन, लॅपटॉप सापडला आहे. मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी बोलत असून, त्वरीत चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल, अशी बतावणी चोरट्यांनी तक्रारदाराकडे केली.

आणखी वाचा-सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल मंदिरात चोरी

चोरट्यांनी त्यांच्या समाजमाध्यमातील खात्यावर मुंबई पोलिसांचे बोधचिन्ह वापरले होते. तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असून, तातडीने खासगी बंकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे चोरट्यांनी सांगितले. तक्रारदाराच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन चोरट्यांनी खात्यातून एक कोटी एक लाख ३० हजार रुपये चोरून नेले. पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One crore of fraud with doctor pretending to find narcotics in an overseas courier pune print news rbk 25 mrj