सर्वागीण शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना एक धडा शिकविणार असून, समस्या जाणून घेणार आहेत. गुरुवारपासून हा उपक्रम सुरू होत असून, पुढील तीन महिन्यांत दुसऱ्या गुरुवारी सर्व शाळांमध्ये हा उपक्रम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या उपक्रमाविषयी माहिती दिली. पुणे जिल्ह्य़ाबरोबरच पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्य़ांतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या पाच जिल्ह्य़ांमध्ये एकूण १३ हजार ९४ शाळा आहेत. दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी हा उपक्रम होणार आहे. पुणे विभागामध्ये १० ऑक्टोबरला तीन हजार ८५३ शाळांमधून या उपक्रमाची सुरुवात होईल. त्यानुसार पुढील तीन महिन्यांत उपक्रम पूर्ण करण्यात येईल.
प्रत्येक अधिकाऱ्यांना शाळा नेमून दिल्या जाणार आहे. त्यानुसार त्या-त्या शाळेत संबंधित अधिकारी सकाळी दहा वाजता उपस्थित राहतील. सुरुवातीला शालेय परिपाठाच्या कार्यक्रमात अधिकारी सहभाग घेतील. त्यानंतर प्रत्यक्ष वर्गावर जाऊन एक धडा शिकवतील. शाळेच्या पालक संघाची बैठक घेऊन विविध समस्याही ते जाणून घेतील. त्याचप्रमाणे दिवसभरातील उपक्रमात शालेय व्यवस्थापन समितीचीही बैठक ते घेतील. त्याच दिवशी संबंधित अधिकारी अहवाल तयार करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ई-मेलवर पाठवतील.
पाहुणचार व सत्कार सोहळय़ांना फाटा
अधिकारी शाळेवर येणार म्हटल्यावर त्यांचा पाहुणचार व सत्कार सोहळे होणार हे लक्षात घेऊन अशा प्रकारचा कोणताही पाहुणचार किंवा सत्कार न स्वीकारण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे दुपारी संबंधित अधिकारी विद्यार्थ्यांसमवेत भोजन करणार आहेत. या उपक्रमाचा हेतू शाळेची तपासणी करणे हा नसून, विद्यार्थी व पालकांमध्ये शिक्षणविषयक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हा आहे, असेही विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

Story img Loader