लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली असली तरी पाणीकपातीबाबत महापालिकेने सावध भूमिका घेतली आहे. पाणीकपात रद्द न करता तूर्त दर गुरुवारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय मागे पडला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणातील पाणीसाठा घटल्याने शहरात १८ मे पासून आठवड्यातील दर गुरुवारी पाणीबंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अंदाजानुसार जून महिन्यात पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.
हेही वाचा… पुण्यात खड्डेच खड्डे चोहीकडे!
मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने ऑगस्ट अखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात दिवसाआड पाणीबंद ठेवण्याच्या हालचाली सुरू झाली होती. मात्र वाढीव पाणीकपातीचा निर्णय लांबणीवर पडला होता. या पार्श्वभूमीवर धरणातील उपलब्ध पाणीसाठा, हवामान खात्याचा पावसाचा अंदाज याचा आढावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून घेण्यात आला.
शहर आणि परिसरात तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत दोन अब्ज घनफुटाने (टीएमसी) पाणीसाठा वाढला आहे. येत्या काही दिवसांत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने पाणीसाठ्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र महापालिकेने सावध भूमिका घेतली आहे. पाणीसाठा वाढत असला तरी पुढील काही दिवस दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र दिवसाआड पाणीबंदचा निर्णय सध्या लांबणीवर ढकलण्यात आला आहे. धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास सुरुवात झाल्यानंतरच पाणीकपातीचा निर्णय रद्द होणार आहे. त्यापूर्वी पाणीसाठ्याचा आढावा घेतला जाणार आहे.