भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा घेणाऱ्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘डी मोरा’ पबमध्ये सट्टा लावण्यात आला होता. तेथून लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच मोबाइल, सट्टा लावण्यासाठी आवश्यक साहित्य ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखेने रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही कारवाई केली.
श्रीपाद यादव असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. डी-मोरा पबमध्ये क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने रात्री उशिरा पबमध्ये छापा टाकून श्रीपाद यादवला ताब्यात घेतले. तो पबमध्ये क्रिकेट सामन्यावर घेऊन सट्टा घेत असल्याचे उघडकीस आले. तेथून लाखो रुपयांची रोकड, मोबाइल, साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी ही कारवाई केली.
भारतीय संघाला रविवारी आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील ‘अव्वल चार’ फेरीच्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. मोहम्मद रिझवान (५१ चेंडूंत ७१ धावा) आणि मोहम्मद नवाज (२० चेंडूंत ४२) यांच्या फटकेबाज खेळींमुळे पाकिस्तानने पाच गडी आणि एक चेंडू राखून सरशी साधली.