-मुकुंद संगोराम
शहरातली प्रत्येक मोकळी जागा हे राजकारण्यांपुढील मोठे आव्हान असते. अशा जागा लवकरात लवकर ताब्यात कशा घेता येतील आणि त्याचे तेवढय़ाच गतीने वाटोळे कसे करता येईल, याचा विचार रात्रंदिवस करणाऱ्यांनी एकदा पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाटय़मंदिराला जरूर भेट द्यावी. बालगंधर्व रंगमंदिराच्या खालोखाल उत्तम नाटय़गृह म्हणून लौकिक मिळवलेल्या या वास्तूचे सध्या जे काही मातेरे झाले आहे, त्याबद्दल कुणालाही जराही खंत नाही. देशात नाटक हा कलाप्रकार जिवंत ठेवण्यात पुणे शहराचा फार मोठा वाटा आहे. नेमक्या याच शहरात रंगमंदिरांची अवस्था दारुण आहे. तिकडे बालगंधर्व पाडायची तयारी सुरू झाली आहे, तर अण्णा भाऊ साठे रंगमंदिरातील ध्वनियंत्रणा राजरोस चोरली जात आहे.
नाटकाला जाणारा रसिक आंदोलनकर्ता नसतो, याचा जेवढा म्हणून गैरफायदा घेता येईल, तेवढा यशवंतराव चव्हाण नाटय़मंदिरात घेतला जात आहे. सगळे रसिक मुकाटय़ाने सगळा छळ सहन करीत आहेत. प्रशस्त जागेत उभारलेल्या या मंदिरात आणखी एक इमारत उभी राहू शकते, असे लक्षात येताच राजकारण्यांनी लगेचच तसा घाट घातला. नव्या इमारतीचे काम इतकी वर्षे रेंगाळत ठेवले, की कुणाला धड वाहन लावता येत नसे. रस्त्यावर वाहन लावण्याएवढी जागाच उरू दिलेली नसल्याने वाहन चालक लांब कुठेतरी ते लावून नाटक पाहताना, सतत आपल्या वाहनाचीच काळजी करत बसतात, याचीही जाण कुणाला असण्याचे कारण नाही. सध्याच्या अवस्थेत तेथे वाहन लावणे हे अग्निदिव्याहूनही कठीण झाले आहे. प्रवेशासाठी असलेल्या तीन कमानींपैकी कोणत्या कमानीतून आत जाता येते, हे सहज कळू न शकल्याने सगळय़ांची भंबेरी उडते. नाटय़गृहात जाण्यासाठी संपूर्ण इमारतीला वळसा घालून पोहोचताना, जागोजागी उभी केलेली वाहने इतका अडथळा निर्माण करतात, की कशाला आलो इथे अशी भावना निर्माण व्हावी.
पालिकेच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या रसिक राजकारण्याचे हे स्मारक आता अतिशय वाईट अवस्थेत आहे. तेथील वाहनतळ अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे मनस्ताप सहन कराव्या लागणाऱ्या पुणेकरांचे हाल होत आहेत. मुद्दा एवढाच, की जर पालिकेनेच या जागेचे नियोजन केले असेल, तर ते तसेच बालगंधर्वच्या जागी होणाऱ्या नव्या संकुलात होणार नाही कशावरून? पालिकेचा काम करण्याचा अनुभव इतका खालच्या पातळीचा आहे, की बालगंधर्वच्या जागेत नेमके असेच होईल, हे सांगण्यास ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळेच बालगंधर्वच्या पुनरुज्जीवनाबद्दल मनात सतत शंकेचे काहूर उठते. महापालिकेला धड रस्ते बांधता येत नाहीत. शहराला वेळेत आणि पुरेसा पाणीपुरवठा करता येत नाही. मैलापाण्याचे शुद्धीकरणही करता येत नाही. मोकळय़ा जागा नगरसेवकांच्या घशात जाताना, त्याला कुणी विरोधही करत नाही. हे सगळे चित्र इतके करुण आहे, की या शहराच्या भविष्याबद्दल कळवळा असलेला प्रत्येक संवेदनशील नागरिक केवळ आक्रंदन करीत राहील.
महापालिकेने बांधलेल्या सगळय़ा नाटय़गृहांमधील व्यवस्थांची झाडाझडती करण्याएवढा वेळ कुणापाशी नाही. केवळ नेते मंडळींच्या कार्यक्रमावेळी ते चकाचक असले की पुरे! ज्या शहरात पहिले संगीत नाटक जन्मले, ज्या शहरात ‘प्रभात’ ही चित्रपटसंस्था नावारूपाला आली, ज्या पुण्यात समांतर नाटय़चळवळ अजूनही (सुदर्शन किंवा ज्योत्स्ना भोळे सभागृह) खासगी व्यवस्थांमुळेच तग धरून उभी आहे, त्या शहरात घोले रस्त्यावरील नेहरू केंद्रातील छोटय़ा नाटय़गृहाचा वापर कोण, कशासाठी आणि केव्हा करते, याचा शोध पालिकेच्या प्रशासनाने घ्यायला हवा. ही हेळसांड अशीच सुरू राहिली, तर पुण्याचे हे उरलेसुरले वेगळेपणही पाणी नसलेल्या आणि मैलापाणीच वाहत असलेल्या मुठा नदीत बुडून जाईल.
mukund.sangoram @expressindia.com