Pune Shivshahi Bus Rape Case Update : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका पडीक शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर सर्वत्र संतप्त भावना व्यक्त झाल्या. या पार्श्वभूमीवर घटना घडल्यापासून फरार असलेला आरोपी दत्तात्रय गाडेच्या अखेर पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून फरार असलेला आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचाही वापर केला. शेवटी त्याच्या गावात एका कॅनॉलच्या खड्ड्यात दत्तात्रय गाडे लपलेला पोलिसांना सापडला. यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्थानिक नागरिकांचे आभार मानले असून ते त्यांच्या सत्कारासाठी गुणाट गावात जाणार आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
“एसटी स्थानकातील २३ सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्थानकाबाहेरील ४८ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दीड ते दोन तासांत आम्ही आरोपीची ओळख पटवली होती. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही आरोपीच्या गावात जावून शोधमोहिम घेत होतो. पण आरोपी तेव्हा सापडला नाही. अखेर तो आज सापडला आहे. याकरता मी गावातील नागरिकांचे धन्यवाद देतो. त्या गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत. तिथे ज्या-ज्या लोकांनी मदत केली, त्यांचं विशेष अभिनंदन करणार आहोत”, असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.
“शेवटच्या माहितीवरून आम्ही आरोपीला पकडलं. शेवटची माहिती आली की तो कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता. तो कोणालातरी दिसला आणि मग तो तिथून पळाला. ड्रोनच्या सहाय्याने जी दिशा दिसली, त्यातून त्याला अटक करण्यात आली. ज्याने शेवटची माहिती दिली, त्याला एक लाखांचं बक्षिस देण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त गावासाठी काय करता येणार, याचाही आम्ही विचार करणार आहोत”, असं अमितेश कुमार म्हणाले.
आरोपीला पकडायला आम्हाला उशीर झाला, पण आज त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला आज कोर्टात सादर केलं जाणार आहे, असंही ते म्हणाले.
आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न
पुणे पोलीस आयुक्त म्हणाले, “प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार आरोपीच्या गळ्यावर दोरीचे वळ आहेत, या वळानुसार त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असं आरोपीने सांगितलं आहे. परंतु, दोरी तुटल्यामुळे आणि इतर लोक आल्यामुळे त्याचा जीव वाचला.”
“त्याने खरंच आत्महत्येचा प्रयत्न केला होता का याची चौकशी करण्याकरता पथक तिथे पाठवण्यात येणार आहे. परंतु प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार त्याच्या गळ्यावर दोरीचे वळ होते”, असं आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.