पुणे : इस्लामिक स्टेटच्या पुणे मॉड्युलप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आणखी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. महंमद शाहनवाज आलम (वय ३१, मूळ झारखंड), असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. जुलै महिन्यात कोथरूड येथे दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली तेव्हा आलम पसार झाला होता. आलम याचा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग आढळून आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) शोध घेत असलेल्या महंमद युनूस महंमद याकू साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३) यांना कोथरूड पोलिसांनी जुलै महिन्यात अटक केली. त्यांचा साथीदार आलम पसार झाला होता. तेव्हापासून तपास यंत्रणा त्याचा शोध घेत होत्या. लपण्याचे ठिकाण शोधण्यात, शस्त्र चालवण्याचे आणि स्फोटकांचे सराव वर्ग आयोजित करण्यात आलमचा सहभाग होता.
हेही वाचा >>> “हिंदूचे सरकार म्हणता आणि गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करता”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आमदार रवींद्र धंगेकरांचा टोला
पुणे पोलीस आणि राज्य दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) दहशतवाद्यांना अटक करून ‘इस्लामिक स्टेट’चे (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त केले. साकी आणि खान यांनी पुणे आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोट केले होते. या दोघांना राहण्यास खोली देणारा अब्दुल कादिर दस्तगीर पठाण आणि आर्थिक मदत करणारा मेकॅनिकल अभियंता सिमाब नसरूद्दीन काझी यांना ‘एटीएस’ने अटक केली. या दहशतवाद्यांनी पुण्यासह काही शहरांमध्ये घातपाताचा कट आखला होता. ‘एनआयए’ने महाराष्ट्र मॉड्यूलप्रकरणी डॉ. अदनान सरकार याला कोंढव्यातून अटक केली. मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शर्जिल शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक करण्यात आली. तरुणांची माथी भडकवून त्यांना ‘आयएस’मध्ये भरती करून घेण्याचे महाराष्ट्र मॉड्यूल दहशतवाद्यांनी आखले होते. या दहशतवाद्यांच्या सूचनेनुसार साकी आणि खान घातपाताचा कट आखत होते.