पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण अमेरिकेहून आला आहे. मुंबईमार्गे तो पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाला. या रुग्णाच्या मुंबई-पुणे प्रवासाचा तपशील घेण्याचे काम सुरु आहे अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैस्कर यांनी दिली. पुण्यात आता करोना बाधितांचा आकडा १७ वर पोहोचला आहे.

गर्दी कमी करण्यासाठी पीएमपीएलच्या बसेसच्या फेऱ्याही कमी करण्यात आल्या आहेत. मागच्या दोन दिवसात पुण्यातून ११ हजार जण बाहेर गेले तर, आठ हजार जणांनी पुण्यात प्रवेश केला. शहरात आवश्यक त्या ठिकाणी पीएमपीएलच्या बसेस सोडल्या जातील, काही प्रमाणात बस कमी केल्या आहेत अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.

पुण्यात उद्यापासून आधार कार्डाची सेवाही बंद करण्यात आली आहे. आरटीओ कार्यालय बंद करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत आरटीओ ऑफिस बंद राहणार आहे. त्यामुळे वाहन परवाने मिळणार नाहीत. करोना संशयितांनी अजिबात घराबाहेर पडू नये. एका संशयितांमुळे इतरांना त्रास होता कामा नये. क्वॉरंटाईन मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे दीपक म्हैस्कर यांनी सांगितले.

Story img Loader