भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भविष्यनिर्वाह कार्यालयात जमा न करता अपहार केल्याप्रकरणी समृद्ध जीवन चिटफंड कंपनीचा संचालक महेश मोतेवार याच्यासह दोघांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
भविष्यनिर्वाह निधी कार्यालयातील निरीक्षक सुरेश फाळके यांनी या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समृद्ध जीवन चिटफंड कंपनीचा संचालक महेश मोतेवार आणि राजेंद्र पांडुरंग भंडारे (रा. दमानीनगर, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१४ ते मार्च २०१६ या कालावधीत अडीचशे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्यनिर्वाह निधीची बारा लाख ३४ हजार रुपये कापून घेण्यात आले. ही रक्कम त्यांनी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात भरली नाही. त्यानंतर मोतेवार याला नोटीस बजाविण्यात आली. मात्र, मोतेवार आणि संचालकांनी भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरली नाही. त्यामुळे निरीक्षक फाळके यांनी तक्रार नोंदविली. मोतेवार हा सध्या ओदिशा पोलिसांच्या ताब्यात आहे, तर त्याची पत्नी वैशाली फरार झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक उमाकांत पुणे तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा