पुणे : व्यावसायिक आणि निवासी मिळकतीकडून पाणी देयके भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आता देयके न भरणाऱ्या मिळकतींना प्रतिमहा एक टक्के दंडात्मक व्याज आकारणीचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील व्यावसायिक आणि निवासी पाणीपट्टीची थकबाकी तब्बल ६५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत थकबाकीच्या रकमेवर कोणतेही व्याज आकारले जात नव्हते. त्यामुळे थकबाकीची रक्कमही वाढत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पाणीपट्टीची रक्कम ३१ जानेवारीपासून पुढील ६० दिवसांत न भरल्यास थकबाकीच्या रकमेवर एक टक्का दंड आकारण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने केला होता. या प्रस्तावाला महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनीही मंजुरी दिली होती. त्यानुसार ही मुदत ३१ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. त्यानंतर थकबाकीच्या रकमेवर एक टक्का दंड आकारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली.

हेही वाचा – “मावळमधून गद्दारांचा पराभव करून खासदार होणार”, ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा विश्वास

महापालिकेकडून रेल्वे, छावणी परिषद, पुरातत्त्व विभागाच्या मिळकती, केंद्र तसेच राज्य शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालयांना पाणीपुरवठा केला जातो. या कार्यालयांना महापालिका केवळ पाण्याची देयके पाठविते. ही कार्यालये नागरिकांना विविध सेवा देत असल्याने त्यावर कारवाई करता येत नाही. मात्र, या कार्यालयांकडून अनेक वेळा पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ केली जाते. या कार्यालयांना वारंवार नोटीस देऊनही त्यांच्याकडून पाण्याची थकबाकी भरली जात नाही. त्यामुळे त्यांनाही दंड आकारला जाणार आहे. तसेच हा दंड केवळ व्यावसायिक पाणी मीटर असलेल्या थकबाकीवर आकारला जाणार आहे. उत्पन्नवाढीच्या दृष्टीनेही या निर्णयाचा फायदा होईल, असा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा – पिंपरी : ‘त्या’ उपनिरीक्षकाच्या मोटारीतून दोन किलो मेफेड्रोन जप्त

३१ मार्चपूर्वी थकबाकी भरावी

जलमापकाद्वारे पाणीपुरठा होणाऱ्या ग्राहकांना महापालिकेकडून देयके पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, काही ग्राहकांना देयके न मिळाल्यास त्यांनी ३१ जानेवारीपर्यंतची देयके लष्कर, स्वारगेट, एसएनडीटी-चतु:श्रृंगी पाणीपुरवठा विभागाकडून घ्यावीत आणि ३१ मार्चपूर्वी थकबाकी भरावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One percent penalty on overdue water payments from april pune print news apk 13 ssb
Show comments