स्थानिक कलाकारांसह उद्घोषक नाराज

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : ‘एक राज्य एक आकाशवाणी केंद्र’ या प्रसारभारतीच्या धोरणानुसार आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह सर्व स्थानिक वाहिन्यांवरून मंगळवारपासून (१ फेब्रुवारी) सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत मुंबई केंद्रावरून सादर होणारे कार्यक्रमच सहक्षेपित होणार आहेत. त्यामुळे आकाशवाणीच्या राज्यातील २८ स्थानिक केंद्रांवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणाऱ्या स्थानिक कलाकारांसह उद्धोषकांना फटका बसणार आहे. अतिरिक्त महानिदेशकांच्या आदेशानुसार १ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व स्थानिक आकाशवाणी केंद्रांनी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत मुंबई केंद्राच्या कार्यक्रमांचे सहक्षेपण करावे, असे आदेश अतिरिक्त महानिदेशकांच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी काढले आहेत. सध्या दुपारी होणार असलेले सहक्षेपण पुढच्या टप्प्यात सायंकाळी आणि त्यानंतर दिवसभर लागू होईल, असा दावा सूत्रांनी केला.

सर्व केंद्रांना चांगले कार्यक्रम उपलब्ध व्हावेत, यासाठी सध्या तीन तास समान सहक्षेपणाचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व केंद्रांना त्यात सहभागी होता येईल, असेही या सूत्राने स्पष्ट केले. मुंबईहून होणाऱ्या प्रसारणादरम्यान दिल्लीतून प्रसारित होणारे हिंदूी समाचार, मुंबई केंद्राचे गाता रहे मेरा दिल, स्थानिक जाहिराती आणि त्यानंतर नादब्रह्म (शास्त्रीय संगीत), वनिता मंडळ, गीतबहार, राष्ट्रीय मराठी बातम्या, जिल्हा वार्तापत्र, भावधारा हे सर्व कार्यक्रम मुंबईतून सहक्षेपित होतील. त्यानंतरचा कृषीवाणी हा कार्यक्रम सर्व केंद्रांनी आपापल्या स्तरावर सादर करायचा आहे.

विविध प्राथमिक केंद्रावरून स्थानिक समस्या लक्षात घेऊन स्थानिक मानसिकतेचा विचार करून त्या त्या मुद्दय़ावर विविध प्रकारे श्रोत्यांशी संवाद साधला जातो. अन्य ठिकाणाहून सहक्षेपण झाल्यास आकाशवाणी आणि श्रोत्यांच्या नात्यातील आत्मा लोप पावेल, अशी भीती आकाशवाणीच्या उद्घोषकांनी व्यक्त केली.   या निर्णयाला विरोध करण्यासाठी श्रोत्यांनी आकाशवाणीच्या उद्घोषकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एकाच ठिकाणचा उद्घोषक,कलाकार, विषय तज्ञ यांच्याकडून आकाशवाणीचे प्रादेशिक वैविध्य जपले जाणे अशक्य वाटते. भाषा संवर्धनाच्या दृष्टीनेही असे वैविध्य जपण्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे भाषा तज्ञांचे मत असताना हा निर्णय क्लेशकारक आहे,असा दावा उद्घोषकांनी केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One state one radio station policy announcer annoyed ysh