पिंपरी पालिकेच्या माध्यमिक शाळेत पाच रूपये देण्याच्या मुद्दयावरून नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली, त्यात एका  विद्यार्थ्यांचा वर्गातच मृत्यू होण्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी पिंपरीगावात घडली. या प्रकरणी त्याच्याच वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्यांस ताब्यात घेण्यात आले आहे.
हृषीकेश बापू सरोदे (वय-१५, रा. भाटनगर, पिंपरी) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. पालिकेच्या जुन्या ‘ड’ प्रभाग  कार्यालयाच्या इमारतीत माध्यमिक शाळांचे वर्ग भरतात. त्याच ठिकाणी दुपारी ही घटना

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
विद्यार्थ्यांची हाणामारी झाला तो वर्ग

घडली. इयत्ता नववी (ब) च्या वर्गात  सकाळी इंग्रजीचा तास संपला. त्यानंतर गणिताचा तास होता. मधल्या पाच मिनिटांच्या काळात हे नाटय़ घडले. शारीरिक शिक्षणासाठी दहा विद्यार्थ्यांचे गट करण्यात आले होते. त्यात एका प्रकल्पासाठी विद्यार्थिनिहाय १५ रूपये गोळा करण्यात येत होते. हृषीकेशने १० रूपये दिले व पाच द्यायचे राहिले होते. ते पाच रूपये का दिले नाहीत, अशी विचारणा आरोपी विद्यार्थ्यांने त्याच्याकडे केली, त्यावरून वाद सुरू झाला व त्याचे पर्यावसन वर्गातच दोघांमध्ये हाणामारी सुरू होण्यात झाले. या वेळी हृषीकेशच्या पोटात ठोसे लागले. झटापटीच्या वेळी तो बेशुध्द पडला. खेडकर व सोनटक्के या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची मारामारी सोडवली. रिक्षा करून बेशुध्द हृषीकेशला जवळच्या जिजामाता रूग्णालयात हलवले. तथापि, तेथील डॉक्टरांनी यशवंतराव चव्हाण रूग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, चव्हाण रूग्णालयात हृषीकेशला आणण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेने शहरात खळबळ उडाली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी उत्तरा कांबळे, शिक्षण मंडळाचे सभापती फजल शेख, सदस्य धनंजय भालेकर, चेतन घुले, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी शेलार, पोलीस निरीक्षक मोहन विधाते, माजी उपमहापौर जगन्नाथ साबळे आदींनी घटनास्थळी भेट दिली. तानाजी शिंदे म्हणाले, की पोलीस तपास करून अहवाल देतील, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. हा प्रकार विद्यार्थ्यांच्या दंगामस्तीतून घडला आहे. सभापती शेख यांनी ही घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, या घटनेनंतर विद्यार्थ्यांना श्रध्दांजली वाहून शाळा सोडून देण्यात आली. या प्रकरणी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन विधाते करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One student dies in quarrel in pimpri