मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूतोवाच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्यात नागपूर, मुंबई आणि पुण्यात मेट्रो मार्गिकांचे जाळे निर्माण केले जात आहे. शहरात पीएमपी आणि मेट्रोच्या माध्यमातून एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येत आहे. भविष्यातील या वाहतुकीसाठी एकच तिकीट असावे, असे नियोजन सुरू आहे, असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात केले.  पुणेकर जगाला सल्ले देतात. त्यांचे सल्लेही चांगले असतात. मात्र याच सल्ल्यांमुळे मेट्रोच्या कामाला काही काळ विलंब झाला. मात्र उशीर होऊनही मेट्रोचे काम वेगात प्रगतिपथावर आहे, असेही ते म्हणाले.

कर्वे रस्त्यावरील मेट्रोच्या दुमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री गिरीश बापट, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार विजय काळे, प्रा. मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, माधुरी मिसाळ, नगरसेवक मुरलीधर मोहोळ आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित या वेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले,की पुण्यात मेट्रोचे काम रखडले होते. पुण्यात कोणतेही काम असो, पुणेकरांचे सल्ले मोठे असतात. मेट्रोची मार्गिका कशी असावी, याबाबत पुणेकरांमध्ये मतमतांतर होते. त्यामुळे आम्हीच संभ्रमात होतो. मात्र काहीशा विलंबाने मेट्रोचे काम सुरु झाले आहे.

सध्या मेट्रो मार्गिकेचे पंचवीस टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम झपाटय़ाने पूर्ण होणार आहे. शहरात खासगी दुचाकी गाडय़ांची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होत असेल तर कितीही उड्डाणपूल केले तरी वाहतुकीची कोंडी ही होणारच आहे. त्यामुळे कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. मेट्रो आणि पीएमपीच्या माध्यमातून हे काम सुरु झाले आहे. स्वारगेट परिसरात ट्रान्सपोर्ट हबचे काम प्रस्तावित आहे. मुंबईमध्ये बीएसटी, मेट्रो, मोनो रेल्वे, जलवाहतूक आहे. या सर्व वाहतुकीचे तिकीट एकच आहे. त्या धर्तीवर पुण्यातही प्रयत्न करण्यात येतील.

बापट-काकडे जुगलबंदी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात खासदार अनिल शिरोळे यांच्या ‘पर्व विकासाचे, पुण्याच्या प्रगतीचे’ या कार्यअहवालाचे प्रकाशन झाले. या वेळी बापट-काकडे जुगलबंदी रंगली. खासदार शिरोळे हे सच्चे कार्यकर्ते आहेत. ते कमी बोलतात मात्र काम खूप करतात, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले. हा धागा पकडून आता शिरोळे यांचे मित्र काकडे यांनी कमी बोलावे आणि शिरोळे यांनी जास्त बोलावे, अशी कोटी शिरोळे यांना उद्देशून गिरीश बापट यांनी केली. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One ticket for all modes of public transport in future says devendra fadnavis
Show comments