िपपरी पालिकेने ऐन उन्हाळ्यात एकच वेळ पाणी देण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडून तयार करण्यात येत आहे. जवळपास अडीच महिने हे धोरण राबवण्याचा पालिकेचा मानस असून आयुक्तांच्या मान्यतेनंतरच याची अंमलबजावणी होणार आहे. उन्हाळ्यात सुट्टीसाठी नागरिक गावी जातात. मात्र, त्याचे प्रमाण यंदा कमी असेल व दुष्काळी भागातील नागरिकांचा ओढा शहराकडे राहील, अशी शक्यता गृहीत धरून नियोजन करावे लागणार असल्याचा युक्तिवाद पाणीपुरवठा अधिकारी करत आहेत.
राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. अनेक जिल्ह्य़ातील नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. अशा परिस्थितीत िपपरी-चिंचवड शहरातही पाणीकपात करण्याचे धोरण राबवण्यात येत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक वास्तव्याला आहेत. त्यात विदर्भ, मराठवाडा, सातारा आदी दुष्काळी भागातील नागरिक मोठय़ा संख्येने आहेत. उन्हाळी सुट्टीत त्यांचे गावाकडे जाणे ठरलेले असते. मात्र, यंदा दुष्काळ असल्याने तिकडे जाण्याचे प्रमाण कमी राहील. त्याचप्रमाणे, उन्हाळ्यात दुष्काळाची तीव्रता वाढल्यानंतर तेथील नागरिक पै-पाहुण्यांकडे शहराकडे येतील. त्यामुळे किमान २० टक्के वाढ गृहीत धरून पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. धरणात पाण्याचा मुबलक साठा असला तरी आगामी काळात कमतरता भासू नये, यासाठी आतापासूनच पाण्याची कपात करण्याची गरज आहे. पाण्याची मागणी वाढून यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार, एकवेळ पाण्याचे धोरण प्रस्ताव मांडण्यात आल्याचे सांगण्यात आले.
िपपरी-चिंचवड हे अतिवेगाने नागरीकरण होणारे शहर आहे. पाण्याचा पुरेसा साठा असला तरी पाण्याचे स्रोत मर्यादित आहेत. भविष्यकाळासाठी इतर पर्यायांचा विचार सुरू आहे. अलीकडच्या काळात पालिकेने काही र्निबध घालून घेतले आहेत. त्यानुसार, नव्या बांधकामांना पाणीपुरवठा न करण्याचा, नव्याने नळजोड न देण्याचा तसेच हद्दीबाहेर पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय पालिकेने यापूर्वी घेतला आहे. शहरातील लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने इतरत्र पाणी देऊ शकत नसल्याचे पालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळेच आळंदी नगरपरिषदेने पाण्याची मागणी केल्यानंतर, आम्हालाच पाणी नाही, तर तुम्हाला कुठून देऊ, अशी भूमिका पालिकेने घेतली होती. दरम्यान, उन्हाळ्यामध्ये पाण्याची मागणी वाढते. अशावेळी एक वेळ पाणी देण्याचा निर्णय का घेतला, याविषयी अधिकारी उघडपणे बोलत नाहीत. एकीकडे २४ तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा पालिकेकडून होते आणि दुसरीकडे, ऐन उन्हाळ्यात एकवेळ पाणी देण्याचा निर्णय घेतला जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.