पिंपरी-चिंचवड शहरासही एकवेळ पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयावर मंगळवारी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. बुधवारपासून अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मोहिनी लांडे व आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.  
महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची बैठक झाली. या वेळी गटनेते सुलभा उबाळे, विनोद नढे, अनंत कोऱ्हाळे, सुरेश म्हेत्रे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख महावीर  कांबळे आदी उपस्थित होते. आयुक्त म्हणाले, जूनमध्ये पाऊस झाला नाही. अवघे १६.१४ टक्के पाणीसाठा असून तो १५ ऑगस्टपर्यंत पुरेल. पावसाने आणखी ओढ दिल्यास तीव्र टंचाईला सामोरे जावे लागेल. अशा परिस्थितीत सर्वानुमते पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत दिवसातून दोन वेळा होणारा पाणीपुरवठा आता एकच वेळ करण्यात आला आहे. याशिवाय, नवे नळजोड देणे बंद करण्यात आले असून पिण्याचे पाणी बांधकामांना, तसेच गाडी धुण्यासाठी वापरता येणार नाही. गळतीचा शोध घेण्यात येईल, खासगी टँकरला पिण्याचे पाणी दिले जाणार नाही, यावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. नाइलाजाने पाणीकपात करावी लागत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर तसेच आयुक्तांनी केले आहे. उपलब्ध पाणीसाठय़ाचा दर १५ दिवसांनी आढावा घेतला जाईल व त्यानुसार पुढील कपातीचे धोरण ठरवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
‘यापुढे २४ तास पाणी नाही’
मोठा गाजावाजा करत सुरू केलेली २४ तास पाणी देण्याची घोषणा या कपातीच्या निमित्ताने महापालिकेने मागे घेतली आहे. शहरात एकीकडे एकवेळ पाणी दिले जात असताना दुसरीकडे २४ तास पाणी देणे विरोधाभास ठरणार असल्याने सरसकट एकवेळ पाणी दिले जाणार आहे. वेळप्रसंगी या योजनेचा फेरआढावा घेण्यात येईल, असे आयुक्त राजीव जाधव यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One time water supply to pimpri chinchvad