नगर-कल्याण रस्त्यावरील माळशेज घाटात पडलेल्या महाकाय शिळा फोडून एकेरी वाहतूक सुरू करण्यात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला अखेर गुरुवारी यश मिळाले. त्यामुळे आठ दिवसांनंतर त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाली.
माळशेज घाटात २४ जुलैला मध्यरात्री डोंगराचा कडा कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. माळशेज घाटात एवढी मोठी दुर्घटना व इतक्या कालावधीत वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याची घटना प्रथमच घडली आहे. महाकाय शिळा फोडण्याचे काम भरपावसात व धुक्यामध्ये सुरू होते. शिळा सुरुंगाद्वारे फोडून वाहतूक व्यवस्था सुरू करण्याचे प्रयत्न महामार्ग विभागाकडून सुरू होते. एकेरी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने दगड बाजूला करण्यात आला व गुरुवारी सकाळी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. दुपारी साडेबारा वाजता नगर-कल्याण एसटी आळेफाटा बसस्थानकावरून कल्याणच्या दिशेने सोडण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२च्या मुरबाड येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या आठ दिवसांच्या परिश्रमातून वाहतूक सेवा सुरळीत करण्यास यश मिळाले, अशी माहिती महामार्गाचे उपअभियंता प्रदीप दळवी व शाखा अभियंता एस. ए. कदम यांनी दिली.
वाहतूक सुरळीत झाल्यामुळे माळशेज घाटात येणाऱ्या पर्यटकांकडून धांगडधिंगा होऊ नये, तसेच मद्यपींवर नियंत्रण राहावे, यासाठी पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे व मुरबाडचे उपअधीक्षक भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व पोलीस यांचे पथक तयार करण्यात आले असून, मद्यपींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. माळशेज घाटात मद्य ने-आण करण्यात मज्जाव करण्यात येणार आहे, अशी माहिती टोकावडे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली.
मृतांच्या नातेवाइकांना मदत
माळशेज घाटात महाकाय शिळा पडल्याने या शिळेखाली मृत्युमुखी पडलेले टेम्पोमालक रघुनाथ किसन वाघ (वय ५०, रा. पिंपळवंडी) व टेम्पोचालक नामदेव ऊर्फ नवनाथ केदार (वय ३०, रा. मेंगाळवाडी) यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाच्या वतीने दीड लाख रुपये व मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपये अशी मदत जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व आमदार वल्लभ बेनके यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा