लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात एक वर्षांची बालिका बेवारस अवस्थेत सापडली. बालिकेला बेवारस अवस्थेत सोडून पसार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकातील पार्सल विभागाच्या परिसरात बेवारस अवस्थेत बालिका आढळून आली. बालिका रडत असल्याने पार्सल विभागातील कर्मचाऱ्यानी पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालकांचा शोध न लागल्याने त्यांनी याबाबतची माहिती बंडगार्डन पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बालिकेला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. बालिकेच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.
आणखी वाचा-कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, कसे आहे नियोजन ?
बालिकेला बेवारस अवस्थेत सोडून देणाऱ्या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक कंचन काळे तपास करत आहेत. सिंहगड रस्ता भागात महिनाभरापूर्वी नवजात अर्भक बेवारस अवस्थेत सोडून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.