बिबटय़ाचे कातडे विक्रीसाठी पुण्यात घेऊन येणाऱ्या तरुणाला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून नऊ लाख रुपये किमतीचे बिबटय़ाचे कातडे जप्त केले आहे. न्यायालयाने त्याला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
प्रवीण ऊर्फ पव्या मनोहर पाटील (वय २२, रा. विजयनगर, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे पोलीस कर्मचारी सुनील पवार यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती डुल्या मारुती चौकात बिबटय़ाचे कातडे विक्रीसाठी घेऊन येणार आहे. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवून या ठिकाणी सापळा लावला. एक व्यक्ती संशयीत दिसल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे सहा फूट लांब आणि एक फूट दोन इंच रुंदीचे काळे-पिवळे पट्टे, ठिपके असलेले कातडे जप्त करण्यात आले आहे. या कातडय़ाची किंमत साधारण नऊ लाख रुपये आहे. पाटील याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने आपण कर्जबाजारी झाल्यामुळे बेळगाव येथील एका व्यक्तीच्या सांगण्यावरून पुण्यात हे कातडे देण्यासाठी आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.