गुजरात सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्मारकासाठी देशभरात सुरू असलेल्या अभियानांतर्गत पुण्यात रविवारी (८ डिसेंबर) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून गुजरातच्या महसूलमंत्री आनंदीबेन पटेल या कार्यशाळेत उपस्थित राहणार आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकात्मता ट्रस्टतर्फे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. ट्रस्टचे निमंत्रक हरीभाई शहा, अॅड. एस. के. जैन आणि अनिल शिरोळे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. पटेल यांच्या स्मारक उभारणीसाठी देशभरातील नागरिकांचे योगदान असावे, अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आखण्यात आले असून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून १५ डिसेंबर रोजी ‘रन फॉर युनिटी’ ही दौड आयोजित करण्यात आल्याचे शहा यांनी सांगितले. त्यानंतर अडीच लाख शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘राइट फॉर युनिटी’ ही निबंध स्पर्धा घेतली जाणार आहे.
स्मारकासाठी जे अभियान देशात सुरू झाले आहे, ते यशस्वी करण्यासाठी विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्या अंतर्गत रविवारी पुणेकर नागरिक व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. गुजरातच्या महसूलमंत्री आनंदीबाई पटेल या कार्यशाळेत उपस्थित राहणार असून स्मारकाची व अभियानाची माहिती त्या देणार आहेत. अभियानाची चित्रफीत या वेळी दाखवली जाणार आहे. तसेच स्मारक योजनेचे सादरीकरणही केले जाणार आहे. देशातील सर्व खेडय़ांचाही सहभाग या स्मारकाच्या उभारणीत असावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून रविवारी होणाऱ्या कार्यशाळेत पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी प्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader