एकतर्फी प्रेमातून एका उच्चशिक्षित तरुणीवर सुपारी दिलेल्या गुंडांमार्फत हल्ला करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुऱ्हाडीने वार करण्यासाठी हल्लेखोरांनी भररस्त्यात तरुणीचा पाठलाग केला. राजेंद्रनगर भागात घडलेल्या या घटनेत सुदैवाने तरुणीला कोणतीही इजा झाली नाही. फरासखाना पोलिसांनी शुक्रवारी अवघ्या तीन तासांत आरोपींचा शोध घेऊन तिघा भाडोत्री गुंडांसह त्यांना सुपारी देणाऱ्या तरुणाला अटक केली.
सनी उर्फ लक्ष्मीकांत मनोहर क्षीरसागर (वय २९, रा. राम मंदिराजवळ, जनता वसाहत, पर्वती), संतोष मारुती जाधव (वय २८, तोरणा अपार्टमेंट, बालाजीनगर), प्रभू प्रकाश पालकर (वय २३, रा. तळजाई पठार, पद्मावती), सोमनाथ दिनकर जाधव (वय २९, रा. मणेरवाडी, खानापूर, ता. हवेली) या चौघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. क्षीरसागर याने संबंधित तरुणीला ठार मारण्यासाठी संतोष जाधव, पालकर व सोमनाथ जाधव यांना एक लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरात राहणारी ही तरुणी उच्चशिक्षित असून, एका नामांकित कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरीस आहे. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती दुचाकीवरून कार्यालयाकडे निघाली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास राजेंद्रनगर येथील सचिन तेंडुलकर उद्यानाजवळ एक तरुण अचानक हातात कुऱ्हाड घेऊन तिच्या दिशेने धावत आला. त्याने तिच्या दिशेने कुऱ्हाडीने वारही केला, मात्र तरुणीने वेळीच दुचाकी वळविल्याने हा वार दुचाकीच्या आरशावर लागला. या प्रकाराने घाबरलेली तरुणी दुचाकी जागीच सोडून जीव वाचविण्याच्या उद्देशाने रस्त्याने धावत सुटली. हल्लेखोर तरूणही कुऱ्हाड घेऊन तिच्या मागे धावला. सकाळच्या वेळी रस्त्यावर वर्दळ असल्याने हा प्रकार पाहणाऱ्या नागरिकांनी आरडाओरड केली. त्यामुळे हल्लेखोर तरुण काही अंतरावरच असलेल्या त्याच्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला.
घटना पाहिलेल्या नागरिकांनी तातडीने १०० क्रमांकावर पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती कळविली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी तत्काळ आरोपींचा तपास घेण्यास सुरुवात केली. पोलीस कर्मचारी रमेश चौधर यांना आरोपी पळून गेलेल्या दुचाकीची माहिती मिळाली. त्यामुळे दत्तवाडी भागातून दुचाकीच्या मालकास ताब्यात घेतले. संबंधित दुचाकी मित्रास वापरण्यासाठी दिली असल्याची माहिती त्याने दिली. त्यावरून पुढचे सर्वच चित्र स्पष्ट होऊन तरुणीला मारण्याची सुपारी घेतलेल्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सुपारी देणाऱ्या क्षीरसागरचे नाव पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. क्षीरसागर याचे या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र, ती त्याला दाद देत नसल्याने त्याने तिला मारण्यासाठी सुपारी दिली असल्याचे स्पष्ट झाले.
फरासखाना ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, कर्मचारी सागर केकाण, हर्षल शिंदे, अमेय रसाळ, संदीप पाटील, इकबाल शेख, रमेश चौधर, विनायक शिंदे, शंकर कुंभार, अमोल सरडे, बापू खुटवड, केदार आढाव यांनी ही कारवाई केली.

Story img Loader