पुणे : लागवडीपासून सुरू झालेले कांदा पिकामागील शुक्लकाष्ट यंदा सुरूच आहे. दर्जेदार, निर्यातक्षम कांदा बाजारात येत नसल्याने मागणी नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. परिणामी दरही पडले आहेत. बाजारात नेलेला कांदा वेळेत विक्री होत नाही. त्यात भर म्हणून पावसाळी वातावरणामुळे हवेतील आद्र्रता वाढून चाळीत ठेवलेला कांदा सडू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे राज्याबरोबर केंद्र सरकारचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिकच्या कळवण तालुक्यातील बार्डे येथील कांदा उत्पादक शेतकरी पंडित वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा लागणीपासूनच संकट निर्माण झाले आहे. थंडीत कांद्याची लागवड होते. कांदा जसजसा मोठा होईल, तसतसे तापमानात थोडी थोडी वाढ होत जाऊन कांदा काढणीला येण्याच्या काळात उष्णता वाढणे कांदा पिकाला पोषक असते. पण, यंदा अचानक थंडी, अचानक उष्णता, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्याचा फटका कांद्याला बसला. चाळीत साठवलेला कांदा फार तर पाच महिने चांगला राहतो.  विक्रीसाठी कांदा बाजारात नेला तरीही सौदे वेळेवर होत नाहीत. आठवडा सुट्टीचा दिवस वगळूनही कामगार नाहीत, मागणी नाही, असे सांगून बाजार बंद ठेवला जातो. त्यामुळे आवक वाढून दर आणखी पडतात. सध्या सरासरी ९०० ते १२०० रुपये प्रति िक्वटल दर मिळतो आहे.

कशामुळे?

काढणीच्या वेळी उष्णतेची लाट आल्यामुळे कांदा जमिनीत सडला, कांद्याची पात वाळून गेल्यामुळे कांदा योग्य प्रकारे पक्व झाला नाही. परिणामी कांद्याचा दर्जा खालावला. आकार कमी राहिला. हा कांदा काढल्यापासून दरात पडझड सुरूच आहे.

परिस्थिती काय?

एप्रिलमध्ये काढलेला कांदा आता सहा-सात महिने झाले तरीही चाळीतच आहे. पावसाळी वातावरणामुळे हवेतील आद्र्रता वाढत आहे. चाळीतील कांद्याला कोंब येत आहेत. काळी बुरशी वाढून कांदा सडतो आहे.

यंदा निर्यातक्षम, दर्जेदार कांदा बाजारात नाही. शंभर ट्रॅक्टरमागे फक्त दहा ट्रॅक्टरमधील कांदा दर्जेदार असतो. दर्जेदार कांद्याला आजही १५-१६ रुपये प्रति किलोचा दर मिळतो. पण, दर्जेदार कांदा अत्यंत कमी आहे. परिणामी बाजारात मागणी कमी आहे. निर्यात सुरू असली तरीही वेगाने होत नाही. श्रीलंकेला पाठविलेल्या कांद्याचे पैेसेच आले नाहीत, त्यामुळे पुन्हा श्रीलंकेला कांदा पाठविलाच नाही.

किरण निखाडे, कांदा व्यापारी (कनाशी, ता. कळवण)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion farmers in distress as prices fall zws