राहुल खळदकर, लोकसत्ता
पुणे : नवीन लाल कांद्याची आवक राज्यातील प्रमुख बाजारात मोठया प्रमाणावर सुरू झाली आहे. महिनाभरापूर्वी कांदा तेजीत होता. नवीन लाल कांद्याची नगर, सोलापूर, पुणे बाजार समितीच्या आवारात आवक वाढल्याने कांदा दरात घसरण झाली आहे. निर्यातबंदी, तसेच ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणावर कांदा विक्रीस पाठविल्याने दरात मोठी घट झाली आहे.
किरकोळ बाजारात लाल कांद्याचे प्रतिकिलोचे दर २५ ते ३० रुपये दरम्यान आहेत. घाऊक बाजारात दहा किलो कांद्याचे दर १५० ते २५० रुपये दरम्यान आहेत. नवरात्रोत्सवानंतर घाऊक बाजारात जुन्या कांद्याची आवक कमी होत गेली. कांद्याचा मोठया प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे कांदा दरात अचानक मोठी वाढ झाली. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर ७० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. कांदा दरवाढीची झळ ग्राहकांना एक ते दीड महिना सोसावी लागली, असे मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पुणे पुस्तक महोत्सवात साडेआठ लाख प्रतींची विक्री… उलाढाल ‘इतक्या’ कोटींची
दिवाळीनंतर नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली. लाल कांद्याची लागवड पुणे जिल्ह्यातील शिरुर तसेच नगरमधील पारनेर, श्रीगोंदा परिसरात केली जाते. नवीन लाल कांद्याची आवक राज्यातील सर्व बाजार समितीच्या आवारात सुरू झाली असून, लाल कांद्याच्या दरात घट झाली आहे. सोलापूर बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी ६०० ट्रक लाल कांद्याची आवक झाली. गेल्या आठवडयात सोलापूर बाजार समितीच्या आवारात १२०० ट्रक लाल कांद्याची आवक झाली होती. नगर, बीड परिसरातील शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणावर कांदा विक्रीस पाठविल्याने दरात घट झाली. रविवारी मार्केट यार्डातील बाजार आवारात १५० ट्रक कांद्याची आवक झाली. राज्यातील प्रमुख बाजार समितींच्या आवारात लाल कांद्याची आवक मोठया प्रमाणावर सुरू झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
कांदा दरात तूर्तास वाढ नाही
दीड महिन्यापूर्वी तेजीत असलेल्या कांदा दरात घट झाली आहे. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणावर लाल कांदा विक्रीस पाठविला. फेब्रुवारी महिन्यात उन्हाळ कांद्याचा हंगाम सुरू होणार आहे. सध्या बाजारात कांदा मुबलक उपलब्ध असून, तूर्तास कांदा दरात वाढ होणार नाही.