राहुल खळदकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : परतीच्या पावसाचा कांदा रोपांना तडाखा बसल्याने नवीन लाल कांद्याच्या हंगाम यंदा पहिल्यांदाच लांबणीवर पडला आहे. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणारा हा हंगाम दोन ते अडीच महिने लांबणार आहे. त्यामुळे नवा कांदा मोठय़ा प्रमाणावर बाजारात येणार नसल्याने येत्या काही दिवसांत जुन्या आणि साठवणूक केलेल्या कांद्याला मागणी वाढण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>> ‘कसला मर्द’ म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना शहाजीबापू पाटील यांनी दिलं उत्तर, म्हणाले “माझ्या मर्दानगीचं वेड…”

साठवणुकीचा कांदाही कमीच असल्याने दरवाढीची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, या दरवाढीचा फायदा उत्पादक शेतकऱ्यांना किती प्रमाणात मिळणार, याबाबत प्रश्नचिन्हच आहे. नवीन लाल कांद्याची (हळवी) लागवड नाशिक, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर भागात मोठय़ा प्रमाणावर केली जाते. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने नवीन कांद्याची रोपे वाहून गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. साधारणपणे नवीन लाल कांद्याची लागवड ऑगस्ट महिन्यात केली जाते. नोव्हेंबर महिन्यात लाल कांद्याचा हंगाम सुरू होतो. यंदा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे नवीन कांद्याचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना पुन्हा कांदा लागवड करावी लागणार आहे. त्यामुळे नवीन कांद्याचा हंगाम यंदा पहिल्यांदाच दोन ते अडीच महिने लांबणीवर पडला असून यंदा बाजारात नवीन कांद्याची आवक साधारणपणे पुढील वर्षी १५ जानेवारीनंतर सुरू होईल, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.    सध्या बाजारात जुना कांदा उपलब्ध आहे. जुन्या कांद्याचा साठा संपत चालला आहे. चाळीत साठविलेल्या जुन्या कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे जुन्या कांद्याच्या प्रतावरीवर परिणाम झाला आहे.

हेही वाचा >>> परराज्यात जाणाऱ्या प्रकल्पांवर बोलताना राष्ट्रवादीच्या आमदाराचे मोठे विधान; म्हणाले “अजित पवार यांच्यासारखा मुख्यमंत्री…”

कांदा दरवाढ का, कधीपर्यंत?

नवीन कांद्याचा हंगाम दोन ते अडीच महिने लांबणीवर पडला आहे. अशा परिस्थितीत जुन्या कांद्याला मागणी वाढणार आहे. कर्नाटकातील नवीन कांद्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे. दक्षिणेकडील राज्यातून महाराष्टातील जुन्या कांद्याला मागणी वाढणार आहे. महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचा साठा संपत चालला असून पुढील दोन ते अडीच महिने कांदा दरात तेजी निर्माण होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान

जुन्या कांद्याला मागणी वाढणार असली, तरी चाळीत साठवलेल्या जुन्या कांद्याची प्रतवारी खराब झाली आहे. साठवणुकीतील कांद्याची प्रतवारी खालावल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागणार आहे. चाळीतील साठवलेल्या कांद्याचे वजन कमी भरणार असल्याने त्याची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागणार आहे. ‘नाफेड’कडे जुन्या कांद्याचा साठा मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असला, तरी साठवणुकीतील कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम होऊन कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. अलवर जिल्ह्यातील कांद्याचा हंगाम सुरू झाला आहे. राजस्थानातील कांदा उत्तरेकडील राज्यात विक्रीस पाठविला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला दक्षिणेकडील राज्यांतून मागणी वाढणार आहे. पुढील दोन ते अडीच महिने जुन्या कांद्यावर भिस्त राहणार आहे. यंदा पहिल्यांदाच लाल कांदा (हळवी) आणि उन्हाळ कांद्याचा (गरवी) हंगाम एकत्रित सुरू होणार आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात कांद्याची आवक सुरू होणार आहे.

– रितेश पोमण, कांदा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड, पुणे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion price likely to rise due to unseasonal rain zws
Show comments