कांदा निर्यातीवर ४० टक्के कर आणि किमान कांदा निर्यातमूल्य प्रति टन ८०० डॉलर केल्यानंतरही कांदा दरातील तेजी कायम आहे. दर्जेदार कांद्याला शेतकऱ्यांना ५५ ते ६० रुपये किलो दर मिळत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने कांद्याच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उशिराच्या खरिपात लागवड केलेल्या कांद्याची काढणी डिसेंबरअखेरपासून सुरू होईल. त्यानंतर बाजारात आवक वाढून कांद्याचे दर कमी होतील. मात्र, यंदा खरीपपूर्व, खरीप आणि उशिराच्या खरीप हंगामात कांदा लागवड कमी झाली होती. त्यात पावसाने ओढ दिल्यामुळे कांदा उत्पादन कमी झाले आहे. मागील उन्हाळी हंगामातील कांदा अवकाळी पाऊस, गारपीट आणि उन्हाच्या झळांमुळे खराब झाला होता. त्यामुळे उत्पादनात घट येण्यासह कांदा जेमतेम साडेतीन महिने टिकला, त्यामुळे बाजारात कांद्याचा तुटवडा आहे. नवीन कांदा जानेवारीत बाजारात आल्यानंतर दर आवाक्यात येतील, असा अंदाज कांदा पिकाचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात हलक्या पावसाची शक्यता

दर्जेदार कांदा प्रति किलो शेतकऱ्यांना मिळणारा दर कोल्हापुरात ५५ रुपये, सोलापुरात ७० रुपये, अकोल्यात ६५ रुपये, धुळ्यात ५१ रुपये, लासलगावात उन्हाळी कांदा ५३ रुपये, लाल कांदा ३९ रुपये, जळगावात ३९ रुपये, पुण्यात ५४ रुपये, नागपुरात ६० रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये ५० रुपये आणि कराडमध्ये लाल कांदा ५५ रुपये किलो दराने विकला जात होता. दर्जानुसार कांद्याला सरासरी दर ४२ ते ६० रुपयांच्या दरम्यान राहिला.

किरकोळ बाजारात प्रति किलो ५० ते ८० रुपये दर

बाजार समित्यांमधून शेतकऱ्यांना दर्जानुसार ३० ते ६० रुपये प्रति किलो दर मिळत आहे. हा कांदा किरकोळ बाजारात येईपर्यंत वाहतूक, अडत, बाजार समित्यांचा कर, होलसेल आणि किरकोळ व्यापाऱ्यांचा नफा गृहीत धरून प्रति किलो ५० ते ८० रुपयांवर जात आहे.

हेही वाचा >>> मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गहुंजे क्रिकेट मैदान परिसराला छावणीचे स्वरूप

जानेवारीत दरात नरमाई शक्य दर्जेदार कांद्याची आवक जेमतेम आहे. कांद्याला ५५ ते ७० रुपयांपर्यंतचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. नव्या कांद्याची जानेवारीत आवक सुरू होईल, त्यानंतर दर आवाक्यात येतील. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दर चढेच राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती पुणे बाजार समितीतील अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion prices likely to remain high in november december due to shortage pune print news dbj 20 zws
Show comments