पुणे : किरकोळ बाजारात कांद्याची दरवाढ होऊन कांदा दर्जानिहाय प्रति किलो २० ते ३४ रुपयांवर गेला आहे. नाशिक परिसरात महिनाभरापासून कांद्याचा विक्री दर १५०० ते १६०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहे. पूर्व हंगामी (अगाप) उन्हाळी कांदा बाजारात येऊ लागला आहे. लाल कांद्याच्या (खरीप) आणि उन्हाळी कांद्याच्या (रब्बी) दरात फारसा फरक नाही. मे महिन्यात काढणी होणाऱ्या उन्हाळी कांद्याची साठवणूक होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मार्चमध्ये काढणी होणाऱ्या उन्हाळी कांद्याची साठवणूक होत नाही. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढून दरात आणखी घट होण्याचा अंदाज आहे. कांद्याचा खरेदी दर महिनाभरापासून स्थिर असला तरीही बाजारातील किरकोळ कांदा विक्री दरात महिनाभरात सरासरी पाच रुपयांनी वाढ झाली आहे. राज्यात कांदा प्रति किलो २० ते २५ रुपये किलो, तर उत्तर भारतात कांदा २५ ते ३४ रुपयांवर गेला आहे.

हेही वाचा…आमदाराचे पत्र आणा, ससूनचे अधीक्षक बना! राष्ट्रवादीच्या आमदाराच्या शिफारशीनुसार मंत्र्यांकडून नियुक्ती

एकीकडे कांद्याच्या किरकोळ विक्री दरात वाढ होत असतानाच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२३-२४ या वर्षासाठी फलोत्पादनाचा पहिला अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा देशात सुमारे ४७ लाख टनांनी कांदा उत्पादनात घट होऊन २५४.७३ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात ३४.३१ लाख टन, कर्नाटकात ९.९५ लाख टन आणि आंध्र प्रदेशात ३.५४ लाख टन आणि राजस्थानात ३.१२ लाख टनांनी उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा…‘आयसिस’च्या दहशतवाद्यांचा पुणे, मुंबईसह गुजरातमधील प्रमुख शहरांत बाँम्बस्फोटाचा कट उघड

शुक्लकाष्ट मार्चनंतरही सुरू राहणार?

केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार कांदा निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत आहे. पण, लोकसभा निवडणुका पाहता कांदा उत्पादनात सुमारे ४७ लाख टनांनी घट होण्याचा अंदाज आणि किरकोळ बाजारात कांदा विक्री दरात झालेली वाढ पाहता मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी उठण्याची शक्यता दिसत नाही. उन्हाळी कांदा शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. पण, कांदा विक्रीतून उत्पादन खर्चही निघण्याची शक्यता नसल्यामुळे हमखास पैसे देणारे हे पीक यंदाही शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढविणार, असेच दिसत आहे. केंद्र सरकार जाणीवपूर्वक आमचे नुकसान करीत आहे. किमान मार्चनंतर तरी कांदा निर्यातबंदी उठवावी, अशी आमची मागणी आहे. निर्यातबंदीचा नाशिक परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे, असे मत निफाड येथील कांदा उत्पादक अतिश बोराडे यांनी व्यक्त केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion prices surge in retail markets export ban likely to continue due to prediction of production shortfall pune print news dbj 20 psg