शाळांची पंचवीस टक्के आरक्षित जागांची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया यावर्षी महाराष्ट्र ज्ञान महामंडळच्या (एमकेसीएल) माध्यमातून करण्याचे शासनाच्या विचाराधीन असून मुंबई आणि पुण्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
राज्यातील शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार पंचवीस टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. एमकेसीएलच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे. पालकांनी त्यावर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्यामधून घरापासून शाळेचे अंतर, माध्यम या निकषांनुसार अर्जाचे वर्गीकरण होऊन, लॉटरीपद्धतीने शाळांची प्रवेश यादी तयार होणार आहे. पालकांना कोणत्या शाळेमध्ये किती प्रवेश क्षमता आहे, काय सुविधा आहेत याचेही तपशील संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.
या संकेतस्थळाच्या कार्यपद्धतीबाबत एमकेसीएलतर्फे शासकीय अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण करण्यात आले आहे. मात्र, याबाबत अजून शासन आणि एमकेसीएलबाबत कोणताही करार झालेला नाही, अशी माहिती एमकेसीएलमधील अधिकाऱ्यांनी दिली. पालकांना पसंतीक्रम देण्याची मुभा द्यावी का, एक किलोमीटरच्या निकषाप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवावी की तीन किलोमीटरच्या निकषाप्रमाणे, लॉटरी काढताना कोणत्या मुद्दय़ांच्या आधारे अर्जाचे वर्गीकरण व्हावे अशा काही मुद्दय़ांबाबत शासकीय पातळीवर अजूनही स्पष्टता नसल्यामुळे अजून अंतिम निर्णय झालेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
पंचवीस टक्क्य़ांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया एमकेसीएलकडे?
शाळांची पंचवीस टक्के आरक्षित जागांची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया यावर्षी महाराष्ट्र ज्ञान महामंडळच्या (एमकेसीएल) माध्यमातून करण्याचे शासनाच्या विचाराधीन अाहे.
First published on: 31-12-2013 at 02:44 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online admission process for 25 reserve seats through mkcl