बारामती बाजार समितीत रेशीम कोषाचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला. केंद्र सरकारच्या ई-नाम योजनेअंतर्गत झालेला हा देशातील पहिलाच ऑनलाइन लिलाव होता. कर्नाटकातील गुलबर्गा येथील व्यापाऱ्याने २ लाख ८१ लाख रुपये किंमतीच्या एकूण ५३५ किलो रेशीम कोषांची ऑनलाइन खरेदी केली.
हेही वाचा >>> बारामती ॲग्रोच्या संचालकांवर गुन्हे दाखल करा ; भाजप नेते राम शिंदे यांची मागणी
बारामती बाजार समितीत रेशीम संचालनालय नागपूर यांच्या मान्यतेने रेशीम कोष खरेदी-विक्री केंद्र सुरू आहे. या केंद्रात पुणे, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड, यवतमाळ येथून शेतकरी रेशीम कोष विक्रीसाठी आणतात. राज्यातील एकूण ११८ बाजार समित्यांमध्ये ई-नाम कामकाज सुरू असून, त्यात बारामतीचा समावेश आहे. चार ऑक्टोबर रोजी बारामतीत रेशीम कोषांचा देशातील पहिला ई-लिलाल झाला. कर्नाटकातील गुलबर्गा येथील व्यापाऱ्याने संगमनेर तालुक्यातील चिंचपूर येथील शेतकऱ्यांचे सुमारे ५३५ रेशीम कोष ऑनलाइन खरेदी केले. त्यांची एकूण रक्कम २ लाख ८१ हजार ९९९ इतकी झाली. व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना देय असलेली २ लाख ७९ हजार ६९ इतकी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन जमा केली. ई-नाम अंतर्गत रेशीम कोष विक्रीची सुविधा कायमची सुरू झाल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.