जात पडताळणीची प्रक्रिया पारदर्शक व वेगवान व्हावी यासाठी यापुढे जात पडताळणीसाठी अर्ज ऑनलाइन करण्याची सक्ती करण्यात आली आहे. येत्या २३ जुलै पासून कागदोपत्री अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) डॉ. आर. पी. परिहार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
नोकरी, शिक्षण या ठिकाणच्या सुविधा मिळविण्यासाठी जात पडताळणी दाखल्याची आवश्यकता असते. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना जात पडताळणी करून घ्यावी लागते. राज्य सरकारच्या निर्णयानुसार मराठा आणि मुस्लीम आरक्षणाला मंजुरी मिळाली असल्याने जातपडताळणीच्या अर्जात वाढ होणार आहे. जात पडताळणीसाठी अर्ज केल्यानंतर ते गहाळ होण्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे बार्टीने २०१२ ला https://barti.maharashtra.gov.in.हे संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळावर जात पडताळणीचे अर्ज करता येईल. अर्ज कसा करावा यासाठी संकेतस्थळावर मार्गदर्शिका देण्यात आली आहे. जात पडताळणीची प्रक्रिया पारदर्शक व वेगवान व्हावी यासाठी ऑनलाइन अर्जाची सक्ती करण्यात आली आहे. सकाळी आठ ते रात्री बारा या वेळेत ही सुविधा उपलब्ध असेल आणि अर्ज भरताना काही अडचण आल्यास १८००२३३०४४४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे परिहार यांनी सांगितले.
जात पडताळणीसाठी आता फक्त ऑनलाइन अर्ज
यापुढे जात पडताळणीसाठी अर्ज ऑनलाइन करण्याची सक्ती करण्यात आली आहे. येत्या २३ जुलै पासून कागदोपत्री अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
First published on: 20-07-2014 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online barti verification