‘वर्डल’च्या धर्तीवर ‘शब्दक’ची निर्मिती
चिन्मय पाटणकर, लोकसत्ता
पुणे : रोज नवा इंग्रजी शब्द ओळखण्याची संधी देणारा ‘वर्डल’ हा इंग्रजी ऑनलाइन शब्दखेळ जगभरात प्रचंड खेळला जात असताना आता मराठी शब्दांवर आधारित ‘शब्दक’ या शब्दखेळाची निर्मिती मराठीप्रेमी तरुणांनी केली आहे. ‘शब्दक’ नुकतेच ऑनलाइन उपलब्ध करण्यात आले असून, वर्डलच्या माध्यमातून इंग्रजी शब्दांशी खेळणाऱ्या मराठीजनांना आता मराठी शब्दखेळाची संधी निर्माण झाली आहे.
जॉश वर्डल या अमेरिकन तरुणाने ऑक्टोबर २०२१मध्ये ‘वर्डल’ हा ऑनलाइन शब्दकोडय़ाचा खेळ प्रसिद्ध केला. या शब्दकोडय़ात एक शब्द दिलेला असतो आणि तो शब्द आपल्या शब्दसंग्रहाच्या आधारे सहा संधींमध्ये ओळखायचा असतो. अशा पद्धतीने रोज नवीन शब्द दिला जातो. सध्या या शब्दकोडय़ाचा खेळ जगभरात प्रचंड प्रमाणात खेळला जात आहे. जगभरातील विविध भाषांमध्ये या शब्दखेळाची रूपे निर्माण झाली आहेत. मात्र मराठीत पारंपरिक शब्दकोडय़ाशिवाय वर्डलसारखे कोडे उपलब्ध नसल्याची उणीव लक्षात घेऊन हृषीकेश नेने, केदार म्हसवडे या मराठीप्रेमी तरुणांनी वर्डलचे मराठी रूप ‘शब्दक’ ऑनलाइन प्रसिद्ध केले आहे. त्यांना निरंजन पेडणेकर, राहुल केळकर, प्रशांत पेंडसे यांनी साहाय्य केले आहे. www. shabdak. comया दुव्याद्वारे शब्दकवरील शब्दखेळ खेळता येईल.
‘मराठी शब्दक’च्या निर्मितीविषयी हृषीकेश नेने म्हणाले,की जगभरात वर्डल हा शब्दखेळ खूप लोकप्रिय झाला. मी तो खेळ खेळलो आणि वर्डल सोडवण्याचा प्रोग्रॅम लिहिला. आमच्या कुटुंबाच्या व्हॉट्सअॅमप समूहावर वर्डलविषयी, वर्डल इंग्रजी असल्याबाबत चर्चा झाली. त्यावरून असा शब्दखेळ मराठी भाषेत का नको हा प्रश्न मनात आला. ही कल्पना माझ्या मराठीप्रेमी आणि संगणकप्रेमी मित्रांना सांगितल्यावर त्यांनीही त्याचे स्वागत केले. त्यानंतर मराठी शब्दकच्या निर्मितीचे प्रयत्न सुरू झाले. मराठीची लिपी देवनागरी असल्याने शब्दकसाठी काना, मात्रा कशा पद्धतीने घेता येतील हे लक्षात घेऊन शब्दकच्या संकेतस्थळाचे आधी बिटा रूप तयार करून चाचण्या घेतल्या. तीन अक्षरांच्या शब्दांपासून सुरुवात केली. दैनिक, वैश्विक, शब्दक या नुसार आता रोज एक शब्द सोडवण्यासाठी दिला जाईल. येत्या काळात शब्दकमध्ये काना, मात्रा, वेलांटी, ऊकार आणि अनुस्वार असणारे शब्दही समाविष्ट केले जातील.
हृषीकेशने शब्दकची कल्पना सुचवल्यावर ती प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने विचार सुरू झाला. मुक्तस्रोत प्रणालीचा वापर करून शब्दकची निर्मिती करण्यात आली आहे. शब्दक तयार करताना मराठी भाषा म्हणून स्वतंत्रपणे विचार केला आहे.
‘हिंदूी शब्दक’देखील लवकरच
मराठी शब्दकबरोबरच हिंदूीसाठी स्वतंत्र शब्दक तयार करण्याचा प्रयत्न आहे. मराठी आणि हिंदूीची लिपी देवनागरीच असल्याने आणि मराठी शब्दक तयार झाल्याने आता हिंदूी शब्दक तयार करणे तुलनेने सोपे आहे, असे निरंजनने सांगितले.