घरपोच वेळेत न येणाऱ्या वीजबिलाबाबत विविध तक्रारी असतानाच दुसरीकडे पुणेकरांनी वीजबिल भरणा करण्याच्या अत्याधुनिक पर्यायांचा मोठय़ा प्रमाणावर वापर सुरू केला असल्याचे दिसून येत आहे. पुणे परिमंडलातील ४ लाख ३६ हजार वीजग्राहकांनी डिसेंबर महिन्यामध्ये तब्बल ८४ कोटी ४७ लाख रुपयांचा आॉनलाइन वीजबिल भरणा केला आहे. संकेतस्थळाबरोबरच मोबाइल अॅपच्या माध्यमातूनही वीजबिल भरणा करण्याची व्यवस्था उपलब्ध असल्याने ऑनलाइन वीजबिल भरणा करण्याचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील वर्षभरामध्ये ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्रहकांची संख्या ८३ हजारांनी वाढली असून, सुमारे ३२ कोटी रुपयांनी भरणा वाढला आहे. २०१४ मधील डिसेंबर महिन्यामध्ये पुणे परिमंडलात ३ लाख ५३ हजार वीजग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने ५२ कोटी ३० लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला होता. महावितरणने ६६६.ेंँं्िर२ूे.्रल्ल या संकेतस्थळावर ऑनलाइन वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षी ऑगस्टपासून मोबाइल अॅपही उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब वीजग्राहकांना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड त्याचप्रमाणे नेटबँकिंगद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे रांगेत थांबून वीजबिल भरण्यापेक्षा या यंत्रणेचा वापर करणाऱ्या पुणेकरांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
वीजबिल भरण्याची मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह देयक ऑनलाइन भरण्याची सोय उपलब्ध आहे. मुदतीनंतर भरलेल्या बिलांची पावती महावितरणच्या संबंधित कार्यालयात दाखवणे आवश्यक आहे. महावितरणने संकेतस्थळ, मोबाइल अॅपवरील ऑनलाइन वीजबिल भरणा करण्याबरोबरच इ-मेलद्वारे वीजबिल प्राप्त करण्याचीही व्यवस्था केली आहे. छापील बिलाऐवजी केवळ मेलवर बिल हवे असल्यास गो-ग्रीन हा पर्याय उपलब्ध आहे. याबाबतची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
सव्वाचार लाखांहून अधिक पुणेकर वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाइन’
घरपोच वेळेत न येणाऱ्या वीजबिलाबाबत विविध तक्रारी असतानाच दुसरीकडे पुणेकरांनी वीजबिल भरणा करण्याच्या अत्याधुनिक पर्यायांचा मोठय़ा प्रमाणावर वापर सुरू केला असल्याचे दिसून येत आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 16-01-2016 at 02:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online for paid electricity bill