सायबर पोलिसांकडे २८ तक्रारी दाखल

पुणे : ऑनलाइन खरेदी संकेतस्थळावर उत्पादने खरेदी करण्याचे प्रमाण वाढीस लागले असून सौंदर्य प्रसाधनांपासून सर्व प्रकारची उत्पादने संकेतस्थळाच्या माध्यमातून खरेदी केली जात आहेत. ग्राहकांना घरपोच सर्व प्रकारची उत्पादने, अन्नपदार्थ तसेच जीवनावश्यक वस्तू सहजतेने उपलब्ध होत आहेत.उत्पादनांमध्ये त्रुटी आढळल्यास ग्राहक पुन्हा संबंधित कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रात तक्रार नोंदवितात. सायबर चोरटय़ांनी नेमकी हीच गोष्ट हेरली असून ऑनलाईन उत्पादनांची विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या संकेतस्थळावर फेरफार करुन चोरटे त्यावर स्वत:चा क्रमांक टाकत आहेत. तक्रारदार ग्राहकाने संपर्क साधल्यास त्याला सेवा देण्याच्या नावाखाली चोरटय़ांकडून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहेत.

पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या २८ घटनांची नोंद गेल्यावर्षी झाली आहे. ग्राहक सेवा केंद्रात संपर्क साधणाऱ्या ग्राहकांच्या डेबिट कार्ड, क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती लांबवून त्यांच्या खात्यातील पैसे चोरटय़ांनी स्वत:च्या खात्यात वर्ग केल्याचे उघडकीस आले आहे. ग्राहक तक्रार निवारण केंद्र किंवा सेवा केंद्राआडून चोरटय़ांनी फसवणूक केल्याचे प्रमाण वाढीस लागल्याने सायबर पोलिसांनी ऑनलाइन खरेदी व्यवहार करताना खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे.

ऑनलाइन उत्पादनांची विक्री करणाऱ्या संबंधित कंपन्यांनी संकेतस्थळाची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे.संकेतस्थळावर सायबर चोरटय़ांकडून फेरफार केली जाते. चोरटे कंपनीच्या नावात किचिंतसा बदल करुन बनावट संकेतस्थळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांनी सातत्याने संकेतस्थळावरील कंपनीचे नाव, त्यावर नमूद करण्यात आलेले मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांकाची पडताळणी करणे गरजेचे असल्याचे मत सायबर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी नोंदविले.

ग्राहकांनी ऑनलाइन उत्पादने खरेदी व्यवहारात खातरजमा करताना संबंधित कंपनीची माहिती ‘गुगल’वरुन घ्यावी. या कंपनीचे नाव, ग्राहक सेवा केंद्राचा क्रमांक तसेच त्यावर नमूद करण्यात आलेले दूरध्वनी क्रमांकाची माहिती घ्यावी तसेच संकेतस्थळावर कंपनीचे नाव बरोबर आहे की नाही किंवा त्यातील काही शब्दांची पुन्हा तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

ऑनलाईन उत्पादने खरेदी करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी करताना ‘कॅश ऑन डिलिव्हरी’पर्याय निवडावा. ऑनलाइन उत्पादन खरेदी केल्यानंतर उत्पादन घरपोच उपलब्ध होते, त्या वेळी ग्राहकांनी उत्पादन उघडून पाहावे. त्यानंतरच उत्पादन घरपोच देणाऱ्या कर्मचाऱ्याकडे पैसे द्यावेत. ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ पर्याय निवडल्यास फसवणुकीचे प्रमाण कमी होईल, असे सायबर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले.