पुणे : शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवल्यास अल्पावधीत चांगला परतावा मि‌ळेल, असे आमिष दाखवून शहरात घडलेल्या तीन घटनांमध्ये सायबर चोरट्यांनी तब्बल ९० लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला आहे. याप्रकरणी कोथरुड, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरुड पोलीस ठाण्यात सुनील राजाराम टेंबे (वय ६३, रा.पौड रस्ता) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांची १ मार्च ते ४ मे या कालावधीत ३७ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. तक्रारदार यांच्याशी अनाेळखी व्यक्तींनी संर्पक करून ‘व्हॉटसअप डी-३ आयसीआयसीआय सेक्युरिटी ऑफिशियल स्टॉक’ या समूहामध्ये जोडून घेतले. त्यांना एक लिंक पाठवून आरोपींनी उपयोजन (ॲप) डाऊनलाेड करण्यास सांगितले. त्यात बँक खाते तयार करण्यास सांगून त्यावर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याच्या माध्यमातून किरकोळ रक्कमेचा तक्रारदार यांना गुंतवणुकीवर परतावा दिला.

हेही वाचा >>> कायमस्वरूपींना बोनस पण कंत्राटी मात्र वाऱ्यावर!

त्यानंतर विश्वास संपादन करुन मोठी रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडून आरोपींनी दिलेल्या खात्यावर ३७ लाख ७० हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. परंतु, त्याबदल्यात कोणताही परतावा न देता तसेच मुळ रक्कम परत न करता सदर रकमेची फसवणूक करण्यात आली. याबाबत पाेलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम पुढील तपास करत आहेत. कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दुसऱ्या गुन्ह्यात शिरीष शिवराय गोसावी (वय ६५) यांनी अनोळखी मोबाईल क्रमांक, ए-५९ मारवाडी फायनाशिल सर्व्हिस एमएसएफएल हे ॲप तसेच वेगवेगळे बँक खातेधारक यांचे विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांना अनोळखी आरोपींनी संर्पक करुन विश्वास संपादन करुन शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ३३ लाख ८० हजार रुपये गुंतवणूक घेऊन फसवणू केली. तर, अशाच प्रकारे हडपसर पाेलीस ठाण्यात नीलेश एकनाथ कदम (वय४१) यांनी १९ लाख २३ हजारांची शेअर्स ट्रेडिंग गुंतवणूक अमिषाने फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवड मध्ये ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा; ब्रेड आणि चटणी खाल्ल्याने उलटी आणि भोवळ…

कविता अग्रवाल, अनॉय बॅर्नजी नावाच्या मोबाईल वापरतकर्त्या, वेगवेगळे व्हॉटसअप ग्रुप, ईलाइट रोडस अॅपचे धारक व विविध बँकेचे खातेधारक यांचेवर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअर ट्रेडिंग मार्फेत नफा मिळवून देतो असे सांगून आरोपींनी त्यांना बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडून अधिक नफा मिळवून देण्याचे बहाण्याने फसवणूक केली.