पुण्यात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी विवाहाचे आमिष दाखवून १६ लाख ३२ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुटुंबीयांशी पटत नसल्याने पीडित ज्येष्ठ नागरिक वाघोली भागात एकटे राहत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केली होती. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. सुरुवातीला त्यांना नोंदणी शुल्कापोटी ९२० रूपये भरण्यास सांगण्यात आले. त्यांनी चोरट्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी बतावणी करून त्यांच्याकडून वेळोवेळी १६ लाख ३२ हजार रुपये उकळले.
हेही वाचा : बेकायदा दस्त नोंदणी प्रकरणात सरपंच, तलाठी, प्रांत अधिकारी रडारवर; १६२ बनावट एनए प्रकरणांची माहिती मागविली
पैसे भरल्यानंतर पीडित ज्येष्ठांना स्थळही दाखविण्यात आले नाही. यानंतर त्यांनी चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे तपास करत आहेत.