ऑनलाईन झाल्यामुळे ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र केवळ कार्यक्षेत्राबाहेरच नाही तर सातासमुद्रापार असलेल्या मराठी भाषकांपर्यंत पोहोचले आहे. पहिल्याच ऑनलाईन अंकाचे उत्स्फूर्त स्वागत झाले असून काही वाचकांनी मुद्रित अंक बंद करण्यासंबंधीची इच्छा प्रदर्शित केली आहे.
शतक पार केलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद या राज्यातील आद्य साहित्य संस्थेने काळानुरूप आधुनिकतेची कास धरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र साहित्य पत्रिका या मुखपत्राचा चेहरामोहरा बदलण्यात आला असून हे मुखपत्र ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. महेंद्र मुंजाळ या युवा कार्यकर्त्यांची पत्रिकेच्या संपादकपदी नियुक्त करण्यात आली आहे. मुंजाळ यांच्या संपादकत्वाखाली निघालेला पहिलाच अंक हा  masapapune.orgया परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन ठेवण्यात आला आहे.
एकविसावे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे असून त्यामध्ये ई-बुक्ससारख्या आधुनिक माध्यमाचा वापर करणाऱ्या वाचकांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने पत्रिकेचा अंक ऑनलाईन करण्याचा निर्णय परिषदेच्या कार्यकारिणीने घेतला. नव्या पिढीची वैचारिक भूक भागविण्याबरोबरच युवा वाचक पत्रिकेशी जोडले जावेत हा उद्देशही त्यामागे होता. त्याला पहिल्याच प्रयत्नात चांगला प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत केवळ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आजीव सभासदांपुरताच मर्यादित असलेला हा अंक ऑनलाईन केल्यामुळे सदस्येतरांनाही वाचनासाठी खुला झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके, डॉ. चंद्रशेखर बर्वे, सतीश काळसेकर, डॉ. सु. रा. चुनेकर आणि डॉ. द. ता. भोसले या मान्यवरांनी या ऑनलाईन अंकाचे स्वागत केले आहे.
सातारा, सांगली येथील महाविद्यालयांनी पत्रिकेचा हा अंक डाउनलोड करून घेत तो विद्यार्थ्यांच्या ई-मेल अॅड्रेसवर पाठविला आहे. किमान सव्वाशेजणांनी हा अंक वाचला असल्याचे मला कळविले, असे महेंद्र मुंजाळ यांनी सांगितले. तर, या आधुनिक माध्यमामुळे आमची वाचनाची भूक भागली असल्याचे हजार लोकांनी दूरध्वनी, एसएमएस या माध्यमाद्वारे कळविले आहे. अंक वेळेवर पोहोचत नाहीत अशी तक्रार असलेल्या काही आजीव सभासदांनी आम्हाला पाठविण्यात येणारा मुद्रित अंक बंद करावा, असे पत्राद्वारे सांगितले आहे. ग्रामीण भागातील युवकांनी या अंकासाठी लेखन करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे, असेही मुंजाळ यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा