सर्वच सरकारी कार्यालयांमधील ‘सरकारी काम, सहा महिने थांब’.. अशी मानसिकता असलेला कर्मचारी पूर्वीच्या ‘एमएसईबी’मध्येही होता. नंतर त्याचे कंपनीकरण झाल्याने वीज वितरणासाठी ‘महावितरण’ या कंपनीची स्थापना झाली. कंपनी झाली, पण कर्मचारी तेच असल्याने ‘सहा महिने थांब’ची बाधा कंपनीतही झाली. वीज ग्राहकांशी संबंधित विविध गोष्टींपैकी नवीन वीजजोड मिळण्यात निर्माण केल्या जाणाऱ्या अडचणी कायम राहिल्या. पण, कारभार पारदर्शी करण्याच्या ‘महावितरण’च्या प्रयत्नात नवीन वीजजोडाचाही विचार झाला अन् वीजजोडणीची प्रक्रिया ऑनलाईन झाली. त्यामुळे एजंटगिरी व चिरीमिरीच्या ‘व्हायरस’ला लगाम लागणार आहे.
घरगुती, कृषी, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्व वर्गवारीतील ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने नवीन वीजजोडणी घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही जोडणी घेण्यासाठी भराव्या लागणाऱ्या रकमेचे दरपत्रकही संगणकाच्या माध्यमातूनच दिले जात आहे. त्यामुळे जोडणीसाठी पैसे किती लागणार याची आकडेमोड करण्याची गरज स्थानिक कार्यालयांना राहिली नाही. ग्राहक स्वत: अइॉनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात. मात्र, ग्राहकाने संबंधित कार्यालयात लेखी अर्ज दिला असेल, तर त्याची नोंद ऑनलाईन यंत्रणेत करण्याचे बंधन संबंधिक कार्यालयांना घालण्यात आले आहे. तसे न केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.
एखाद्या नागरिकाने नवीन वीजजोडणीसाठी अर्ज केल्यास पूर्वी प्रामुख्याने एजंटगिरीचा सामना करावा लागत होता. कार्यालयात अनेक फेऱ्या मारूनही वीजजोड मिळत नसल्याची स्थिती होती. आपण सादर केलेल्या अर्जाची सद्य:स्थिती काय, हेही नागरिकाला कळत नव्हते. त्यातूनच चिरीमिरीचा उद्योग फोफावला होता. ऑनलाईन अर्जाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या अर्जाची स्थिती कोणत्याही क्षणी नागरिकाना जाणून घेता येणे शक्य आहे. ग्राहकाला नवीन वीजजोड घेताना कोणताही त्रास होऊ नये व वीजजोडणी मिळेपर्यंत अर्जाची सद्य:स्थिता कळावी, यासाठीच सर्व नवीन वीजजोडण्या केवळ ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आदेशच ‘महावितरण’ने काढले आहेत.
 
अशी आहे वीजजोडासाठी ‘ऑनलाईन’ पद्धत
ग्राहकाला स्वत: वीजजोडासाठी ऑनलाईन अर्ज करायचा झाल्यास महावितरणच्या   http://www.mahadiscom.inया संकेतस्थळावर ‘न्यू कनेक्शन सव्र्हीस’ नावाच्या पर्यायामध्ये सर्व माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. अशा प्रकारे अर्ज करणाऱ्या ग्राहकांना संपर्कासाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक व इ-मेल देणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर कंपनीच्या कॉलसेंटरकडून ग्राहकाशी संपर्क साधला जातो. अर्जात दिलेल्या माहितीची खात्री करून नंतर हा तपशील संबंधित कार्यालयाकडे पाठविला जातो. शहरी भागात सात, तर ग्रामीण भागात दहा दिवसांत संबंधित उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी ग्राहकाशी संपर्क साधतात. जागेची पाहणी करून नवीन जोडणीच्या अर्जावर ग्राहकाची स्वाक्षरी व आवश्यक कागदपत्रं घेतात. त्यानंतर प्रत्यक्ष जोडणीसाठी पुढील कार्यवाही केली जाते. जोडणी मिळण्यास दिरंगाई होत असल्यास ग्राहकांनी १८००२३३३४३५/१८००२००३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Story img Loader