१५ हजार रुपयांत श्रमविरहित प्रबंध उपलब्ध

पदव्यांच्या जुडग्यात सर्वाधिक श्रमाची मानली जाणारी आणि मिळविणाऱ्याला नावाआधी ‘डॉक्टर’ जोडण्याचा सन्मान प्राप्त करून देणारी पीएच.डी. आता कमालीची ‘स्वस्त आणि सोपी’ बनली आहे. पीएच.डी.साठी कोणत्याही विद्यापीठासाठी, कोणत्याही विद्याशाखेच्या जटिल विषयांचे प्रबंध आणि आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांसाठी शोधनिबंध विकणारी यंत्रणा तयार झाली असून त्याद्वारे अवघ्या दहा ते १५ हजारांत तयार प्रबंध आणि शोधनिबंध मिळू लागले आहेत. नामांकित आणि विश्वासार्ह संकेतस्थळांवर या बाजाराच्या जाहिराती उघडपणे केल्या जात आहेत. विनाकष्ट अल्पावधीत ही पदवी पटकाविण्यासाठी पुणे, मुंबई आणि राज्यातील साऱ्याच विद्यापीठांमधील विद्यार्थी या जाहिरातींकडे आकर्षित होत असून शिक्षणाचे बाजारीकरण अधिक विद्रूपपणे समोर येत आहे. एखाद्या विषयात सखोल संशोधन करणाऱ्याला पीएच.डी. मिळते. तीन ते चार वर्षे ग्रंथालयांतील संदर्भ ग्रंथांची छाननी, मार्गदर्शक (गाइड) यांच्या सूचना आणि आपल्या विषयात आधी झालेल्या संशोधनाला पुढे नेऊन त्या विषयात नव्या ज्ञानाची भर प्रबंधाद्वारे घातली जाणे अपेक्षित असते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हा शिरस्ता संपला असून पीएच.डी. मिळविण्यासाठी अनेक गैरप्रकारांचा अवलंब केला जात आहे. त्यातलाच एक नवा प्रकार म्हणजे प्रबंधाची सारी लिखाण सेवा पुरविणाऱ्या यंत्रणेची निर्मिती. पीएच.डी. इच्छुकाला त्यासाठी आपली बुद्धी, श्रम घालविण्याची गरज नाही. प्रबंध लिहून देण्याची सेवा पुरवणारी यंत्रणा विषय ठरल्यानंतर चक्क प्रबंधाची चळत विद्यापीठामध्ये सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे आणून देत आहे. हा व्यवसाय आता फोफावला असून त्यांची प्रबंध तयार करणारी साखळी संपूर्ण राज्यामध्ये तयार झाली आहे.

दोन आठवडय़ांत प्रबंध 

‘दरमहिना साधारण ५ ते १० प्रबंध किंवा शोधनिबंध लिहून देण्याबाबत विचारणा होते. व्यवस्थापन, वाणिज्य, अभियांत्रिकी या शाखांबाबत अधिक विचारणा होते. प्रबंध लिहिणे तांत्रिक असते. त्यामुळे अनेकांना ते लिहिण्यासाठी अडचणी येतात. त्याचप्रमाणे नोकरी करून पीएच.डी. करणाऱ्यांना पुरेसा वेळही मिळत नाही. विषय आणि त्यात काय अपेक्षित आहे, हे कळले की साधारण १५ ते २० दिवसांत आम्ही प्रबंध लिहून देतो,’ अशी माहिती प्रबंध लेखन करणाऱ्या व्यावसायिकाने दिली.

लाखोंची उलाढाल

साधारण १५० पानांचा प्रबंध असेल आणि विषयाचे तपशील तुमच्याकडे असतील, तर १० ते १५ हजार रुपये शुल्क घेतले जाते. यापासून विषय, आकार यांनुसार शुल्क निश्चित होते. हे शुल्क अगदी लाखोंच्या घरातही असते. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान या विषयांसाठी शुल्क अधिक आहे. संशोधनपत्रिकांसाठी शोधनिबंध लिहिताना कोणत्या पत्रिकेसाठी तो लिहिला जात आहे, त्यावर शुल्क अवलंबून असते.

अपेक्षित काय?

शोध निबंध किंवा प्रबंध लिहिणे यामध्ये तांत्रिक बाबीही असतात. मात्र या तांत्रिक बाबी, लेखनाची चौकट, मांडणीची पद्धत, संशोधन पद्धती याबाबतच्या अभ्यासक्रमाचा ‘कोर्स वर्क’मध्ये समावेश करण्यात आलेला असतो. पीएच.डी. करणाऱ्या प्रत्येकाने कोर्स वर्क करणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला या सर्व बाबी माहीत असणे आणि त्याने स्वत: संशोधन करून प्रबंध लिहिणे अपेक्षित असते. त्याचप्रमाणे मार्गदर्शकानेही विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करणे अपेक्षित असते.

लेखन सेवकांची हमी

कोणत्याही विद्यापीठासाठी, कोणताही विषय, विद्याशाखेसाठी प्रबंध लिहून मिळतील, असे ऑनलाइन जाहिरातींमध्ये उघडपणे म्हटले आहे. यात दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून प्रबंधाचा विषय सांगितला, की अनुक्रमणिकेपासून, संदर्भसूचीपर्यंत सर्व घटकांचे लेखन केले जात असल्याची माहिती मिळते. विशेष म्हणजे वाङ्मयचौर्य नसल्याची हमीही दिली जाते. अशी सेवा पुरवणाऱ्यांशी ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधींनी विद्यार्थी म्हणून संवाद साधला. त्या वेळी ‘अनेकांना आम्ही पीएच.डी.साठी तयार प्रबंध दिले असून त्यातून कोणतीही अडचण पुढे येणार नाही. तुम्ही विषय सांगितलात की तुम्हाला त्या विषयाचा प्रबंध लिहून दिला जाईल. तुम्हाला काहीही करावे लागणार नाही,’ असा विश्वास दिला जातो. फक्त पीएच.डी.चे प्रबंधच नाही तर संशोधनपत्रिकांसाठी शोधनिबंध तयार लिहून मिळतात. अगदी नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थांच्या शोधपत्रिकांसाठी शोधनिबंध लिहून दिले जातात.

नामांकित संकेतस्थळांचा वापर

छोटय़ा जाहिराती आणि विविध संकेतस्थळांवरून या व्यवसायाची जाहिरातबाजी केली जाते. क्विकर एज्युकेशन, ओएलएक्स, सुलेखा, इंडिया मार्ट यांसारख्या संकेतस्थळांवर या प्रबंध विक्रीच्या धंद्याची जाहिरातबाजी सुरू आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर या पाच ठिकाणी मिळून साधारण २५० जाहिराती एका महिन्यात या संकेतस्थळांवर दिसून आल्या. त्यामध्ये पुण्यातील सर्वाधिक म्हणजे साधारण १४० जाहिराती आहेत.