१ ऑगस्टपासून राज्यभर अंमलबजावणी

पुणे : विशेष विवाह कायदा १९५४ नुसार नोंदणी विवाह करणाऱ्या जोडप्यांना नियोजित विवाहाची नोटीस, वय आणि रहिवास यांबाबत ऑनलाइन नोटीस बंधनकारक करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून येत्या १ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.

विशेष विवाह नोंदणीसाठी वर व वधू यांना विवाह नोंदणीअधिकाऱ्यांकडे नोटीस देणे आणि तीस दिवसांनंतर विवाह करणे, अशा दोन कामांसाठी जावे लागते. त्यामुळे नोटीस देण्याची संपूर्ण प्रक्रिया नियोजित वर किंवा वधू यांना विवाह नोंदणी अधिकारी कार्यालयात न जाता कोणत्याही ठिकाणावरून ऑनलाइन पद्धतीने करता येण्याची सुविधा १ नोव्हेंबर २०१७ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विवाह नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोटीस आणि त्यासाठी आवश्यक पुराव्यांची कागदपत्रे जमा केल्यानंतर तीस दिवसांच्या आत कोणत्याही प्रकारचा आक्षेप न आल्यास वधू आणि वर तीन साक्षीदारांसमक्ष अधिकाऱ्यांसमोर विवाह करू शकतात. विवाहाचे प्रमाणपत्रही लगेच देण्याची व्यवस्था दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली आहे. मुंबई, मुंबई उपनगर आणि पुणे अशा तीन जिल्ह्य़ांसाठी मात्र स्वतंत्र विवाह नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणी प्रमाणेच विशेष विवाह नोंदणी प्रक्रियेचे संगणकीकरण केले आहे. त्याकरिता राज्यातील सर्व विवाह नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यालये मध्यवर्ती सव्‍‌र्हरवर जोडण्यात आली आहेत. विवाह नोंदणी अधिकारी कार्यालयात आल्यानंतर माहिती भरण्यामध्ये (डाटा एण्ट्री) पक्षकारांचा वेळ जाऊ नये आणि त्यामध्ये चुका होऊ नयेत, यासाठी डाटा एण्ट्री करण्याची सुविधा विभागाने igrmaharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक अनिल कवडे यांनी बुधवारी दिली.

ऑनलाइन नोटीसच्या जनजागृतीचा भाग म्हणून पुण्यातील विवाह निबंधक कार्यालयाच्या परिसरात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने प्रायोगिक तत्त्वावर नागरिकांसाठी ऑनलाइन नोटीस सुविधेची सोय उपलब्ध केली आहे. त्यासाठी स्वतंत्र संगणक व इतर साहित्य तसेच मार्गदर्शक, संगणकचालक यांची सोय विनामूल्य उपलब्ध होणार आहे.

– अनिल कवडे, महानिरीक्षक, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग

Story img Loader