पुणे: देशभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) ऑनलाइन यंत्रणा मंगळवारी बंद राहिली. राष्ट्रीय सूचना केंद्राकडून (एनआयसी) सर्व्हर बदलण्याचे काम सुरू असल्याने सारथी प्रणाली दिवसभर बंद राहिली. त्यामुळे परवान्याशी निगडित सेवा नागरिकांना मिळू शकली नाही. मागील आठवड्यापासून सेवेत अडथळे येत असूनही याबाबत आरटीओकडून पूर्वसूचना मिळत नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
राष्ट्रीय सूचना केंद्राकडून सर्व्हर बदलण्याचे काम मागील आठवड्यापासून सुरू आहे. त्यामुळे देशभरातील आरटीओमधील सारथी प्रणाली बंद पडत आहे. या आठवड्यात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी एनआयसीने सर्व्हरमधील बिघाडाच्या नावाखाली ही प्रणाली बंद ठेवली. आरटीओमधील अनेक सेवा नागरिकांना ऑनलाइन मिळतात. त्यातील वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना, परवान्याचे नूतनीकरण, परवान्यावरील पत्ता बदलणे, बनावट परवाना काढणे यासह परवान्याशी निगडित ऑनलाइन सेवा बंद झाल्या. ऑनलाइन प्रणाली बंद झाल्याने नागरिकांना सेवा मिळण्यात अडचणी आल्या.
हेही वाचा >>>सासवड: मतदान यंत्रांची चोरी; दिल्लीतून गंभीर दखल, कारवाई सुरू
मागील आठवड्यात सर्व्हर बदण्याच्या कामामुळे १ व २ फेब्रुवारीला सारथी प्रणाली बंद होती. त्यानंतर ३ आणि ४ फेब्रुवारीला आरटीओला सुटी होती. या दोन दिवसांत एनआयसीने सर्व्हर बदलण्याचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु, एनआयसीकडून सर्व्हर बदलण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पुन्हा नागरिकांची मोठी गैरसोय झाली. याबद्दल अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
सर्व्हर बदलण्याचा गोंधळ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयसीकडून सर्व्हर बदलण्याचे काम सुरू आहे. एनआयसीच्या जुन्या सर्व्हरमध्ये देशातील ३० कोटी वाहनचालकांची विदा आहे. त्यात महाराष्ट्रातील ३ कोटी वाहनचालकांच्या विदेचा समावेश आहे. जुन्या सर्व्हरमधून नवीन सर्व्हरमध्ये ही विदा घेण्याचे काम सुरू आहे. यामुळे अनेकवेळा सर्व्हरवर ताण येऊन बिघाड होत आहे. यामुळे सारथी प्रणाली बंद पडत आहे.
हेही वाचा >>>महत्वाची बातमी : जुने, त्रासदायक महसूल कायदे होणार कालबाह्य
राष्ट्रीय सूचना केंद्राकडून आरटीओतील ऑनलाइन प्रणालीची सेवा दिली जाते. त्यांच्या सर्व्हरमध्ये दुरुस्ती सुरू असल्याने देशभरातील आरटीओमधील ऑनलाइन सारथी प्रणाली बंद आहे. परवान्याशी निगडित ऑनलाइन सेवा वगळता आरटीओच्या इतर सेवा सुरू आहेत.– संदेश चव्हाण, उपायुक्त, परिवहन विभाग
सारथी प्रणालीमध्ये सुधारणांचे कामकाज सुरू असल्याने पुणे प्रादेशिक परिवहन विभागातील परवान्याशी निगडित सर्व कामकाज मंगळवारी बंद राहिले. परवान्याशी निगडित सेवेसाठी आरटीओ कार्यालयात बोलाविण्यात आले होते अशा नागरिकांना इतर दिवशी बोलावण्यात येईल.- संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी