भारती विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष शुभारंभाच्या निमित्ताने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि वनमंत्री डॉ. पतंगराव कदम एका व्यासपीठावर आले अन् राजकीय शेरेबाजीने समारंभ चांगलाच रंगला. आपल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या असल्याचे कदम यांनी भाषणात जाहीर केले खरे, पण त्यांच्या ‘अपुऱ्या राहिलेल्या इच्छेचा’ उल्लेख शिंदे यांनी केला आणि ती पूर्ण करण्याची ताकद पवार यांच्यातच आहे, असे सांगत पतंगरावांबरोबरच सर्वाच्याच चेहऱ्यावर हास्य आणले.
पतंगराव यांनी भाषणात ‘मला सगळं काही मिळालं आहे,’ असे वक्तव्य केले. त्यावर पवार यांनी शेजारी बसलेल्या शिंदेंच्या कानात ‘अजून एक राहिलं आहे..’ असं सांगितलं. पवारांच्या या टिप्पणीचा आपल्या भाषणात उल्लेख शिंदे यांनी केला. ते म्हणाले, ‘‘पतंगरावांवर सगळ्यांचे प्रेम आहे. मी त्यांना फाटक्या तोंडाचा म्हणत असलो, तरी खरंतर पतंगराव हे एक ओपन युनिव्हर्सिटी आहेत. ते जसे मोकळ्या मनाचे आहेत, तसे शरदराव मिश्किल आहेत. मघापासून ते मिस्किल हसत आहेत. पतंगरावांनी भाषणात ‘मला सगळं मिळालं आहे’ म्हणाले, तेव्हा त्यावर शरदराव माझ्या कानात मिश्किलपणे म्हणाले, ‘फक्त एक राहिलं आहे.’ आता काय राहिलं आहे, ते जाणण्याएवढे आपण जाणकार आहात. पण शरदराव, याबाबतीत माझ्या सारख्याच्या हातात काही नाही. पण तुम्ही मनावर घेतलं तर राहिलेलं काम होऊ शकतं.’’ शिंदे यांच्या वक्तव्याने सर्वानाच खळखळून हसवले. पुढे हाच धागा पकडून पवार काय भाष्य करतात याबाबत उपस्थितांना उत्सुकता होती, पण पवारांनी आपल्या भाषणात या शेरेबाजीवर मौनच पत्करले.
पवार म्हणाले, ‘‘पतंगराव ज्या भागातील आहेत, त्या माण, सोनहिरा या भागातील माणसांवर संशोधन करण्याची गरज आहे. या भागातील माणसांमध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करून परिस्थितीशी लढण्याचे खूप बळ आहे. याच भागात सर्वाधिक दुष्काळ आहे, पण संकटाला घाबरून जाणे, हे या माणसांच्या रक्तातच नाही. प्रचंड जिद्दीने आलेल्या प्रत्येक प्रसंगाशी या भागातील लोक लढत असतात. त्यासाठी पडतील ते कष्टही करतात.’’ या वेळी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘‘शिक्षणाचे व्यापारीकरण झाले असले, तरी काहींनी अजूनही मूल्ये जपली आहेत. त्यापैकीच एक भारती विद्यापीठ आहे. ग्रामीण भागातील नवी पिढी निर्माण करण्यामध्ये रयत शिक्षण संस्थेप्रमाणेच भारती विद्यापीठाचाही मोठा वाटा आहे. पतंगराव कदम यांनी राजकारणात प्रवेश केला, तरी त्यांचे ध्येय सोडले नाही आणि त्यातूनच ही मोठी व्यवस्था निर्माण झाली.’’
भारती विद्यापीठाच्या विस्ताराविषयी बोलताना विविध शिक्षण संकुलांसाठी कशा जमिनी मिळाल्या याचे किस्से पतंगरावांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘दिल्लीतील धोरणे सतत बदलत असतात. दिल्लीतील नेते खुर्चीवर बसून निर्णय घेतात. त्यामुळे भारती विद्यापीठालाही अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. अनेकांच्या सहकार्याने भारती विद्यापीठाबरोबरच बँक, साखर कारखाना अशा अनेक संस्था उभा राहिल्या आणि त्या उत्तम प्रकारे चालल्या आहेत. आता दूध संघासाठीही दिल्लीची मदत मागणार आहे, म्हणजे तोही उत्तम चालेल.’’
या वेळी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे, भारती विद्यापीठीचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, शाळा समितीच्या प्रमुख विजयमाला कदम, उपाध्यक्ष इंद्रजित मोहिते, विश्वस्त आनंदराव पाटील हे उपस्थित होते. या वेळी संस्थेतील माजी गुणवंत विद्यार्थी, विद्यापीठाच्या कार्यात योगदान दिलेल्या व्यक्ती, गुणवंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. भारती विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री दुष्काळ सहायता निधीसाठी ५० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
राजकीय शेरेबाजी, टोल्यांनी झाली ‘भारती’ च्या सुवर्ण महोत्सवाची सुरुवात
त्यांच्या ‘अपुऱ्या राहिलेल्या इच्छेचा’ उल्लेख शिंदे यांनी केला आणि ती पूर्ण करण्याची ताकद पवार यांच्यातच आहे, असे सांगत पतंगरावांबरोबरच सर्वाच्याच चेहऱ्यावर हास्य आणले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-05-2013 at 02:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only pawar will fulfill the will of patangrao kadam shinde sushilkumar