राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजयी होणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी देणार आहे. कुठलीही गटबाजी, वशिलेबाजी करून उमेदवारी दिली जाणार नाही, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांच्या उमेदवारीवर केले आहे. अखेर, महाविकास आघाडी म्हणून वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे, असे नमूद करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसची आज पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव येथे बैठक पार पडली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या बैठकीला शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, इच्छुक उमेदवार भाऊसाहेब भोईर, राजेंद्र जगताप, मोरेश्वर भोंडवे, नाना काटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भाजपा पक्षाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली असली, तरी महाविकास आघाडीचा मात्र उमेदवार ठरताना दिसत नाही. एकीकडे शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांचे नाव राष्ट्रवादी पक्षाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. यावर चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची धुरा सांभाळणारे आमदार सुनील शेळके यांनी अप्रत्यक्षरित्या भाष्य करत राहुल कलाटे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा – पुणे विद्यार्थी गृहात गोंधळ, ४० जणांविरोधात गुन्हा
शेळके म्हणाले की, की राष्ट्रवादीचा उमेदवार उद्या सकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. चिंचवडची उमेदवारी राष्ट्रवादीला मिळावी, अशी अपेक्षा पक्ष श्रेष्ठीकडे केली आहे. बाहेरचा उमेदवार असला तरी महाविकास आघाडी म्हणून उमेदवारी मागत असल्याने त्यावर पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील. राष्ट्रवादी पक्षातील विजयी उमेदवाराला उमेदवारी मिळेल. असे सूचक विधान त्यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले की, कुठलीही गटबाजी किंवा वशिले बाजी करून उमेदवारी दिली जाणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.