विद्येचे माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी बिरूदे मिरविणाऱ्या पुण्यात रस्त्यांवर, गल्ली-बोळात आणि अनेक मोकळ्या जागांवर सायंकाळनंतर सर्रासपणे मद्यपान होत असल्याचा प्रकार सातत्याने दिसत आहे. उघडपणे मद्यपान करण्याच्या जागा वाढल्या असून अशा ‘उद्योगां’वर कोणतीही कारवाई होत नसल्याचीही वस्तुस्थिती आहे.
चायनीज खाद्यपदार्थाचे स्टॉल, अंडा-भुर्जी विकणाऱ्या हातगाडय़ा तसेच अनेक बीअर शॉपी आणि मद्य विकणाऱ्या दुकानांमध्ये तळीरामांची खास सोय करण्यात येत आहे. या प्रकारांबाबत कोणी आवाज उठवू नये म्हणून स्थानिक गुंडांची भीती घालून दमदाटी केली जाते. राजरोसपणे सुरू असणाऱ्या या खुल्या मद्यालयांकडे पोलिसांचेही दुर्लक्ष होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहराच्या मध्यभागातील अतिक्रमणांकडे तसेच अनधिकृत पथारी-हातगाडी व्यावसायिकांकडे महापालिकेचे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने या गाडय़ांवरील गुंडगिरीही वाढली आहे. सायंकाळनंतर चौकाचौकात उभ्या राहणाऱ्या चायनीज खाद्यपदार्थाच्या तसेच अंडाभुर्जीच्या हातगाडय़ांवर राजरोसपणे मद्यपान होत असून सर्व यंत्रणा त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत.
[jwplayer ltMcrIEF]
तळीरामांचे मद्यपान सुरू असताना अनेकदा शिवीगाळ, हाणामारीचेही प्रसंग घडतात. अनेकदा येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना दमदाटीही केली जाते. या दादागिरीमुळे अतिक्रमणे व अनधिकृत व्यवसायही फोफावले आहेत. प्रमुख रस्त्यांवरील खुली मद्यालये आणि त्यांच्या बरोबरीने उपनगरांमध्ये आणि शहरात गल्ली-बोळात अत्यंत शिस्तबद्धरीत्या हा व्यवसाय सुरू आहे. शहरातील अनेक चौकांमध्ये सायंकाळनंतर हे चित्र सर्रास दिसते. बहुतेक ठिकाणी घरगुती वापराच्या सिलेंडरचा वापर अन्नपदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. कायद्याने हा गुन्हा असला तरी बिनदिक्कतपणे त्यांचा वापर सुरू असतो.
दुकानदारांचे अर्थकारण
मद्यप्राशन केल्यानंतर ज्या ठिकाणी हा प्रकार चालतो तेथे म्हणजे चौकात कडेला किंवा पदपथावर किंवा मैदानात मद्याच्या बाटल्या तसेच पाण्याच्या बाटल्या टाकून दिल्या जातात. दुकानातील कर्मचारी किंवा हातगाडीवाले त्या बाटल्या गोळा करतात आणि एकदम आठवडय़ाला भंगारात विकतात. एका दिवसात सुमारे पाचशे ते सातशे बिअरच्या बाटल्या एका दुकानात जमतात. बिअरची बाटली भंगारवाल्यामार्फत पुन्हा कंपनीत जाते. त्यामुळे दुकानदारांचा चांगलाच फायदा होत असल्याने दुकानदार खुले मद्यालय बिनदिक्कत चालवतात.
[jwplayer 055bd0lW]