डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागातर्फे उद्या (२४ सप्टेंबर) खुला दिवस आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत संस्कृत आणि कोशशास्त्र विभागामध्ये सुरू असलेला जगातील सर्वांत मोठा संस्कृत विश्वकोश हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प नागरिकांना पाहता येणार असून, या प्रकल्पातील विविध टप्पे, आतापर्यंत प्रकाशित झालेले खंड या विषयीची माहिती दिली जाईल.
हेही वाचा >>> पुणे : खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत चोरी करणाऱ्या महिला अटकेत ;पुणे, गोवा, हैद्राबादमधील सराफी पेढीत चोरी
संस्कृतमधील शब्दांचा तयार होणारा आगळावेगळा विश्वकोश कोश नागरिकांना पाहता यावा, संस्कृत साहित्यातील ज्ञानठेवा सर्वांपुढे येऊन त्याचा प्रचार प्रसार होण्याच्या उद्देशाने खुला दिवस आयोजित करण्यात आला आहे. डॉ. सुमित्र कत्रे या भाषातज्ज्ञांच्या नेतृत्त्वाखाली संस्कृत विश्वकोशाचा हा प्रकल्प साकारत आहे. खुल्या दिवसाच्या निमित्ताने ऋग्वेदापासून ते १९ व्या शतकातील ग्रंथांपर्यंत जवळजवळ दीड हजार संस्कृत ग्रंथांमधून १ कोटी संदर्भांचे संकलन करून तयार केलेले स्क्रिप्टोरिअम पाहता येईल. वेद, वेदांत, दर्शन, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कृषिशास्त्र, शिल्पशास्त्र अशा तब्बल ६२ विद्याशाखांमधून अनेक शब्दांचे आणि त्यांच्या संदर्भांचे संकलन केले असून त्यांची रचना, त्यांचे अर्थ ऐतिहासिक क्रमाने दिले जातात हे या विश्वकोशाचे वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत या कोशाच्या ३५ खंडांचे प्रकाशन झाले असून ३६वा खंड लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> पुणे : कर्ज मंजुरीच्या आमिषाने १०० ते १५० जणांची फसवणूक ; गुजरातमधून जोडपे अटकेत
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://forms.gle/2jJieSrzwSLXmyHm8 या दुव्याद्वारे नोंदणी करता येईल. तसेच ९९६७१८६९३९, ९३७३१५९६६० या क्रमांकांवर संपर्क साधता येईल, अशी माहिती डेक्कन कॉलेजकडून देण्यात आली.